मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीवरून देशभरात राजकीय वाद सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआरच्या इतिहासाचा संदर्भ देत ही प्रक्रिया नवीन नसल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भारतातील सविस्तर मतदारयादी पुनरीकरणाच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकला. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, सध्या सुरू असलेली विशेष तीव्र फेरतपासणी ही याच दीर्घकाळ चालत आलेल्या प्रक्रियेचा एक नवीन भाग आहे.

फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या निवडणूक व्यवस्थेत मतदार याद्यांच्या विस्तृत पुनर्निरीक्षणाला अनेक दशकांचा इतिहास आहे. मतदार याद्या अधिक अचूक आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळोवेळी त्यांचे सखोल पुनर्निरीक्षण केले आहे.

१९५२ पासून अनेकदा मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण

फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९५२ ते १९५६ या काळात देशातील बहुतांश भागांत मतदार याद्यांचं विस्तृत पुनर्निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर १९५७, १९६१, १९६५ आणि १९६६ मध्येही पुनर्निरीक्षण झाल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काळात १९८३-८४, १९८७-८९, १९९२, १९९३ आणि १९९५ या कालावधीतही मतदार याद्यांचे पुनरिक्षण करण्यात आले. त्यानंतर २००२, २००३ आणि २००४ मध्येही निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

घराघरात जाऊन मतदारांची घेतली जाते माहिती

विस्तृत पुनर्निरीक्षणाच्या प्रक्रियेत घराघरात जाऊन मतदारांकडून माहिती घेणे, मतदार गणना अर्ज वितरित करून ते जमा करणे आणि मतदारांच्या नोंदींची पडताळणी करणे यांचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या प्रक्रियेद्वारे मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्थलांतरामुळे मतदार यादीत बदल

वेगाने होणारे शहरीकरण आणि नागरिकांचे स्थलांतर यामुळे मतदार याद्यांमध्ये सातत्याने बदल होत असतात, असे फडणवीस यांनी म्हटले. नवीन पात्र मतदारांची भर, मतदाराचा मृत्यू, स्थलांतर किंवा दुसऱ्या ठिकाणी नोंदणी यामुळे मतदार यादीतील नोंदी बदलत राहतात. त्यामुळे वेळोवेळी मतदार याद्यांची सखोल पडताळणी आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले.

‘पात्र नागरिक वगळला जाऊ नये’

मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा उद्देश पात्र नागरिकांचा मतदार यादीत समावेश करणे आणि कोणताही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाऊ नये, हा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

‘मतदार याद्यांची अचूकता कायम ठेवण्यासाठी विस्तृत पुनर्निरीक्षण ही निवडणूक व्यवस्थेतील दीर्घकाळापासूनची प्रक्रिया आहे. सध्याची एसआयआर ही त्याच व्यापक प्रक्रियेचा पुढील टप्पा आहे,’ असं फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले.