एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवैध दारूची तस्करी करणाऱ्या एका भरधाव ट्रकने पोलिसांच्या पथकावर ट्रक चालवून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला चिरडले. या भीषण अपघातात खातेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पुरी यांचा मृत्यू झाला. पुरी यांनी ट्रकमधील चालकाकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने थेट ट्रक सुरू केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील वृत्त PTI या वृत्तसंस्थेने दिले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूर-बेतुल महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पुरी यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावरील एका ढाब्याजवळ संशयास्पद स्थितीत उभा असलेला एक ट्रक त्यांना दिसला. हा ट्रक रविवार रात्रीपासूनच तिथे उभा असल्याची माहिती दारूबंदी विभागाच्या उपनिरीक्षक पूजा गेहलोत यांनी ढाबा मालकाची चौकशी केल्यानंतर दिली. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात सोमवारी पहाटे इंदूर-बेतुल महामार्गावर ही घटना घडली असून, या घटनेमुळे मध्य प्रदेश पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पळून जाण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्याला चिरडले
पोलीस निरीक्षक दिलीप पुरी यांनी ट्रकमधील चालकाकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने थेट ट्रक सुरू केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळ काढताना चालकाने ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावरून घातला. या वेळी पोलीस निरीक्षक पुरी ट्रकच्या मागील चाकाखाली आले.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
या भीषण घटनेत दिलीप पुरी हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर उपस्थित पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
चालकाचा शोध सुरू
घटना घडल्यानंतर आरोपी ट्रक चालक काही अंतरावर ट्रक सोडून फरार झाला. पोलीस आणि दारूबंदी विभागाच्या पथकाने ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये एक विशेष गुप्त कप्पा तयार करून त्यात दारूचे बॉक्स लपवण्यात आल्याचे उघडकीस आले. या दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नव्हता.
प्राथमिक तपासानुसार हा ट्रक हरदा येथून खातेगावच्या दिशेने जात होता. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून फरार चालकाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने परिसरात आणि पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.
