भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना चेन्नईतल्या राजीव गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या. मात्र, संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव लवकरच दिल्ली आणण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अचानक त्यांच्या छाती दुखू लागलं
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राकेश पाल आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आयएनएस अड्यार येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या चेन्नई दौऱ्यासंदर्भात काही अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागलं. त्यानंतर त्यांना चेन्नईतल्या राजीव गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दिली प्रतिक्रिया
राकेश पाल यांच्या निधानानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही दुख: व्यक्त केले. राकेश पाल यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दुख:द आहे. त्यांच्या नेतृत्वात भारताने सागरी सुरक्षेसंदर्भात मोठी प्रगती केली. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
हेही वाचा – मोठी बातमी! कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
गेल्या वर्षी महासंचालक म्हणून झाली होती नियुक्ती
राकेश पाल मुळचे उत्तर प्रदेशचे असून जानेवारी १९८९ मध्ये ते भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले होते. ३५ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे २५ वे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांनी नवी दिल्ली येथे उपमहासंचालक (नीती आणि योजना), आणि अतिरिक्त महासंचालक कोस्ट गार्ड म्हणून काम केलं होतं. राकेश पाल यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल २०१३ मध्ये तत्ररक्षक पदक आणि २०१८ मध्ये राष्ट्रपती तत्ररक्षक पदकाने गौरवण्यात आलं होतं.