DGCA gives tree month extension to IndiGo : केंद्र सरकारने शुक्रवारी तुर्कियेच्या विमान कंपनीविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने इंडिगोला या कंपनीबरोबरचा भाडे करार रद्द करण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. दिल्लीसह भारतातील नऊ प्रमुख विमानतळांवर सेवा देणार्या सेलेबी एव्हिएशन या तु्र्कियेमधील कंपनीची सुरक्षा मंजूरी रद्द केल्याच्या काही आठवड्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
एका अधिकृत निवेदनात नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) माहिती दिली आहे की, विमान कंपनी सध्या डॅम्प लीज (damp lease) अंतर्गत टर्किश विमान कंपनीची दोन B777-300ER विमाने वापरत आहे, ज्यासाठी ३१ मे पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये इंडिगोची सहा महिने मुदतवाढ देण्याची विनंती फेटाळण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
लगेचच विमान सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना होणारा त्रास टाळण्यासाठी इंडिगोला डॅम्प लीजवर घेतलेल्या विमानांसाठी एकदाच आणि शेवटची ३१.०८.२०२५ पर्यंत तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. कंपनीकडून या वाढीव कालावधीत टर्किश विमान कंपनीबरोबरील भाडे करार रद्द केला जाईल आणि या ऑपरेशन्ससाठी मुदतवाढ मागितली जाणार नाही असे अश्वासन मिळाल्यानत ही मुदतावढ देण्यात आली आहे, असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.
भारताची तुर्किये येथील सेलेबी एव्हिएशनवर कारवाई
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कियेने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर ब्युरो ऑफ सिव्हील एव्हियशन सेक्युरिटी(बीसीएएस)ने टर्किश फर्म सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे.
तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांनी भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान जाहीरपणे पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला होता. इतकेच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी रविवारी इस्तानबुलला भेट देत एर्दोगान यांची भेट घेतली आहे.