नवी दिल्ली : गेल्या १८ दिवसांत आठ विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटनांमुळे विमान वाहतूक नियामकाने (डीजीसीए) बुधवारी स्पाईसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली. स्पाईसजेट एअरलाईन्स विमान नियम, १९३७ च्या ११ व्या अनुसूची आणि नियम १३४ च्या अटींनुसार सुरक्षित, दक्ष आणि विश्वसनीय विमान सेवा देण्यात अपयशी ठरली आहे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

तांत्रिक बिघाडाच्या घटनांची समीक्षा केल्यानंतर स्पाईस जेटने आंतरिक सुरक्षा आणि देखभालीसाठी योग्य पावले उचलली नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या, असे ‘डीजीसीए’ने या नोटीसमध्ये म्हटले केले असून उत्तर देण्यासाठी तीन आठवडय़ांची मुदत दिली आहे.

‘डीजीसीए’च्या नोटीसीबाबत प्रतिक्रिया देताना नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. शिंदे यांनी या संबंधी ट्वीट केले आहे. ‘ प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या छोटय़ाशा त्रुटीचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. स्पाईसजेटच्या विमानांमध्ये गेल्या १८ दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. स्पाईसजेटने सांगितले की, ‘डीजीसीए’ने दिलेल्या नोटीसीला वेळेत उत्तर देण्यात येणार आहे.

दरम्यान, स्पाईसजेट गेल्या तीन वर्षांपासून तोटय़ात आहे. २०१८-२०१९, २०१९-२०२० आणि २०२०-२०२१ दरम्यान कंपनीला क्रमश: ३१६ कोटी, ९३४ कोटी आणि ९९८ कोटींचा तोटा झाला आहे.

विस्तराच्या विमानात तांत्रिक बिघाड

दिल्ली : दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर विस्तरा एअरलाईन्सच्या विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले. या विमानाने बँकॉकमधून उड्डाण केले होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबत बुधवारी माहिती दिली. इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर मंगळवारी विमानात किरकोळ बिघाड झाल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती विस्तरा एअरलाईन्सने दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सांगितले की, विमानातील तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर ते धावपट्टीवरून दूर करण्यात आले. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.

‘इंडिगो’च्या विमानात धूर

इंडिगोच्या रायपूर इंदूर या दरम्यानचे विमान उतरल्यानंतर वैमानिकांना केबिनमध्ये धूर दिसला. त्यामुळे त्यांनी प्रवाशांना सुरक्षित उतरवले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने सांगितले की, ही घटना मंगळवारी घडली. ए ३२० हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर धूर दिसला. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या संदर्भात इंडिगोने प्रतिक्रिया दिलेली नाही.