नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान तिकीट परताव्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. काही अटींच्या अधीन राहून प्रवासी आता तिकीट काढल्यानंतर ४८ तासांच्या आत अतिरिक्त शुल्क न भरता ते रद्द किंवा बदलू शकतात.
तिकीट परताव्यात विलंब आणि समस्यांबाबत ‘डीजीसीए’कडे प्रवाशांच्या तक्रारी वाढल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
विमान कंपनीच्या संकेतस्थळावरून थेट तिकीट आरक्षित केल्यापासून देशांतर्गत उड्डाणासाठी ७ दिवसांपेक्षा कमी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी १५ दिवसांपेक्षा कमी कालावधी असलेल्या विमानासाठी ही सुविधा उपलब्ध नसेल. तिकीट काढल्याच्या ४८ तासांनंतर ते रद्द केले तर त्याचे शुल्क भरावे लागेल, असे डीजीसीएने म्हटले आहे.
तिकीटामध्ये जर प्रवाशाच्या नावामध्ये काही चुकी असेल तर २४ तासांच्या आत ही चूक दुरुस्त केली तर त्याला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
डीजीसीएने विमान कंपन्यांना प्रवास कालावधीत त्याच पीएनआरवरील प्रवासी किंवा कुटुंबातील सदस्य रुग्णालयात दाखल झाल्यास परतावा किंवा क्रेडिट शेल देण्यास सांगितले आहे.

