वृत्तसंस्था, मुंबई
‘‘इंडिगो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या कार्यालयात (डीजीसीए) गुरुवारी यावे आणि सविस्तर अहवाल सादर करावा,’ असा आदेश ‘डीजीसीए’ने बुधवारी बजावला. इंडिगो विमानांच्या सेवेतील विस्कळीतपणाच्या बाबतीत सविस्तर आकडेवारी आणि सर्व माहिती सादर करावी, असेही ‘डीजीसीए’ने बजावले आहे.
‘डीजीसीए’ने याबाबतीत बुधवारी निवेदन सादर केले. एल्बर्स यांना गुरुवारी दुपारी ३ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. या वेळी होणाऱ्या बैठकीला ‘इंडिगो’चे एल्बर्स यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशानुसार, ‘इंडिगो’ला विमानसेवा पूर्ववत कधी होईल, वैमानिक आणि क्रू भरतीचे नियोजन, वैमानिक आणि केबिन क्रू सदस्यांची सध्याची एकूण संख्या, किती विमानोड्डाणे रद्द झाली आणि किती प्रवाशांना निधी परत दिला, याविषयी सारी माहिती मागितली आहे.
