Dharmendra Pradhan statement Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळील ठिय्या आंदोलन आणि नीट परीक्षेच्या मुद्यावरुन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “पावसाळी अधिवेशनादरम्यान गोंधळ निर्माण करण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे”, अशी टीका प्रधान यांनी केली. “सरकार नीट प्रकरणी संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. तरी देखील राहुल गांधी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा आरोप प्रधान यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून केला.

मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधींचे ठिय्या आंदोलन

नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचा मुद्दा घेऊन विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी (२१ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याही राजीनाम्याची मागणी केली. सरकारकडून केंद्रीय मंत्री जितेद्र सिंह यांनी भेट घेतल्यानंतर देखील राहुल गांधी आंदोलनावर ठाम राहिले.

अखेर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, पवन खेरा यांच्यासह काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले व रात्री उशीरा सुटका केली. दरम्यान, “काँग्रेसने लोकशाही मार्गाने चर्चा करण्याऐवजी राजकीय स्टंटबाजीला प्राधान्य दिले”, अशी टीका प्रधान यांनी केली.

धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधी, काँग्रेसवर टीका

प्रधान यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींवर टीका केली. “राहुल गांधी आणि काँग्रेस पावसाळी अधिवेशनादरम्यान गोंधळ निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवास्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केल्यामुळे जनतेची गैरसोय झाली तसेच, सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले”, असे प्रधान म्हणाले. ​”सरकार चर्चेसाठी तयार असताना देखील काँग्रेसने स्टंटबाजी केली, असा आरोपही प्रधान यांनी केला. गोंधळ आणि वाद निर्माण करणे एवढाच ​राहुल गांधी प्रयत्न असतो, त्यांचा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा उद्देश कधीच नव्हता”, असेही प्रधान पोस्टमध्ये म्हणत आहेत.

सरकार नीट संदर्भात चर्चेस तयार असल्याचे स्पष्टीकरण

नीट संदर्भात सरकार चर्चा करण्यास तरुणांच्या समस्येचे निरसन करण्यास तयार असल्याचेही प्रधान यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
“आमचे सरकार नीट संदर्भात चर्चा करण्यास आणि तरुणांच्या समस्यांचे निरसन करण्यास १०० टक्के वचनबद्ध आहे. देशातील विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर न होता त्यांना चांगली वागणूक मिळायला हवी. गोंधळ, घोषणाबाजीऐवजी त्यांना जबाबदारी हवी आहे. विद्यार्थ्यांना उत्तरं, सुधारणा हव्यात. आमचे सरकार तेच करतंय”, असे प्रधान पोस्टमध्ये म्हणत आहेत.