Dharmendra Pradhan net worth, Education Qualification : नीट पेपरफुटीप्रकरणी देशभरात वादळ निर्माण झालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी जंतर मंतरवर गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे. आज, (२५ जुलै) धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे ते नेमके कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमी काय? त्यांचं शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
५७ वर्षीय धर्मेंद्र प्रधान हे भारतीय जनता पक्षाचे एक अत्यंत प्रभावशाली नेते आहेत. जून २०२४ मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री यांसारखी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
विद्यार्थी नेत्यापासून ते कॅबिनेट मंत्र्यांपर्यंतचा प्रवास
पूर्व भारतात भाजपाचा विस्तार करण्यात आणि महत्त्वाच्या धोरणात्मक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात धर्मेंद्र प्रधान यांचं मोठं योगदान असल्याचं त्यांचे समर्थक सांगतात. प्रधान यांचा जन्म २६ जून १९६९ रोजी ओडिशातील अंगुल जिल्ह्यातील तालचेर येथे एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्र प्रधान हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री होते. धर्मेंद्र प्रधान यांचा विवाह मृदुला ठाकूर यांच्याशी झाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
प्रधान यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमधून केली. प्रधान हे २००० मध्ये पल्लहारा मतदारसंघातून ओडिशा विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर २००४ मध्ये देवगढ मतदारसंघातून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. त्यांनी २००४ ते २००६ या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. तसंच भाजपामध्ये राष्ट्रीय सचिव आणि अखिल भारतीय सरचिटणीस यांसारखी महत्त्वाची पदे सांभाळली. सध्या ते ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
शैक्षणिक पात्रता
धर्मेंद्र प्रधान यांचं सर्वोच्च शिक्षण ‘मास्टर ऑफ आर्ट्स इन एन्थ्रोपोलॉजी’ हे आहे. त्यांनी ही पदवी १९९० मध्ये वाणी विहार, भुवनेश्वर (ओडिशा) येथील उत्कल विद्यापीठातून पूर्ण केली.
कुटुंबाची एकूण संपत्ती
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, प्रधान यांच्या कुटुंबाची एकूण एकत्रित संपत्ती ६ कोटी ३८ लाख आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधान यांचं वार्षिक उत्पन्न १२ कोटी ७४ लाख होतं. तर याच काळात त्यांच्या पत्नी मृदुला ठाकूर यांचं उत्पन्न ४९ लाख होतं. त्यांची मुलगी नैमिषा हिने २०२२-२३ मध्ये ४.६ लाख कमावले होते.
वैयक्तिक संपत्तीची आकडेवारी
धर्मेंद्र प्रधान (स्वतः) – १ कोटी ९९ लाख
जंगम मालमत्ता – १ कोटी ३९ लाख
स्थावर मालमत्ता – ९२ लाख
कर्ज/देणी – ३२ लाख
मृदुला ठाकूर प्रधान (पत्नी) – ४ कोटी १२ लाख
जंगम मालमत्ता – २ कोटी ९५ लाख
स्थावर मालमत्ता – १ कोटी ३७ लाख
कर्ज/देणी – २० लाख
नैमिषा प्रधान (मुलगी) – २५ लाख
जंगम मालमत्ता – २५ लाख
स्थावर मालमत्ता – शून्य
कर्ज/देणी – शून्य
निशांत प्रधान (मुलगा) – १.६२ लाख
जंगम मालमत्ता: १.६२ लाख
स्थावर मालमत्ता: शून्य
कर्ज/देणी: शून्य
बँक ठेवी, पीपीएफ, कर्ज आणि इतर गुंतवणूक
प्रधान कुटुंबाच्या बँक ठेवी, पीपीएफ, मुदत ठेवी आणि इतर वित्तीय ठेवींची रक्कम सुमारे २ कोटी ४७ लाख आहे. २०२४ पर्यंत त्यांच्याकडे ८० कोटी ४० लाख मूल्याचे म्युच्युअल फंड आणि ६७.७२ लाख विमा पॉलिसीमध्ये गुंतवलेले आहेत. प्रधान यांच्यावर पंजाब नॅशनल बँक आणि आयडीबीआय बँकेचे ३१.३८ लाखांचं कर्ज आहे. प्रधान यांनी पत्नी मृदुला ठाकूर यांना १० लाखांचं वैयक्तिक अॅडव्हान्स दिलं आहे. तसंच त्यांनी आपले वडील डॉ. देवेंद्र प्रधान यांना ५ लाख, माधुरी ठाकूर यांना ५ लाख आणि डॉ. मंजुरी ठाकूर यांना २ लाखांचं वैयक्तिक कर्ज दिलं आहे. यामुळे त्यांनी व्यक्तींना दिलेले एकूण कर्ज २२ लाख होते, यामुळे त्यांची एकूण देणी ५३.३८ लाख झाली आहेत.
प्रधान यांच्या मालकीची जमीन
प्रधान यांनी ओडिशामध्ये १२ लाख मूल्याची शेतजमीन आणि २०.५० लाख मूल्याची बिगरशेती जमीन घोषित केली आहे. प्रधान आणि त्यांच्या पत्नीच्या नावे सुमारे १ कोटी ९८ लाखांच्या निवासी मालमत्ता आहेत, ज्यामध्ये इंदिरापुरम (गाझियाबाद) आणि भुवनेश्वर येथील अपार्टमेंट्सचा समावेश आहे.
गाड्या, सोने आणि वाहने
प्रधान यांच्याकडे २०११ मॉडेलची होंडा सिटी कार आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे अनेक कमर्शिअल वाहने आहेत. त्यांनी २०२४ मधील मूल्यांकनानुसार १३.५ लाख किमतीचे २०० ग्रॅम सोनं आणि २.५ किलो चांदी घोषित केली आहे. त्यांच्या पत्नीकडे ३५ लाख किमतीचे ५०० ग्रॅम सोनं आणि १० किलो चांदी आहे. त्यांच्याकडे सुमारे ६ लाख मूल्याच्या इतर वस्तू आहेत, ज्यामध्ये २ लाखांचा कॉम्प्युटर आणि ४ लाखांच्या घरगुती उपकरणांचा समावेश आहे.
