पीटीआय, नवी दिल्ली

भारताचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे रचनेने सर्वसमावेशक, स्थापत्यशास्त्रानुसार आंतर-कार्यक्षम आणि क्षमतेनुसार सार्वभौम असेल, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले.

नवी दिल्ली येथे ‘भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह २०२६’ च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या ‘इंडिया एआय समिट’च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये एनव्हिडिया, ओपनएआय आणि गूगल यासारख्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख सहभागी होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण आणि शिक्षकांना मदत करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात ‘एआय’चा समावेश करणे आवश्यक असल्याचे प्रधान पुढे म्हणाले. सर्व संबंधितांना शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आणि विकसित भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मोजता येण्याजोगे, जबाबदार, नैतिक आणि भारतकेंद्रित सार्वभौम ‘एआय’ प्रारूप तयार करण्याचे आवाहन प्रधान यांनी या वेळी केले.

भारतातील शैक्षणिक संकुलांमध्ये ३० कोटी विद्यार्थी आहेत. इयत्ता तिसरीपासून ते प्रगत संशोधन स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना वयोगटानुसार ‘एआय’चे ज्ञान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘एआय’ हा केवळ तंत्रज्ञानाचा विषय नसून तो सर्वव्यापी आहे. यंत्रे आणि भावना यांची सांगड घालून जर आपण एखादे स्थापत्यशास्त्र तयार केले, तर आपण जगाची मोठी शक्ती बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.