Dharmendra Pradhan resignation demand: “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय आहे. या मागणीसाठी माघार घेणे सरकारला पटत नाही. नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारून, दुरुस्ती करण्यात आली आहे. नीट, सीयुईटी आणि जेईई या प्रवेश परीक्षांचा वारंवार आढावा घेतला जात आहे. आणि सरकारने या प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे”, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दिली आहे.
प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीपुढे सरकार झुकणार नाही – अधिकारी
नीट पेपरफुटी प्रकरणी गेल्या ३० दिवसांपासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरु आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे या आंदोलनाला वेगळी धार मिळाली. संसद मार्च दरम्यान विद्यार्थी, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर विरोधकांनी देखील या प्रकरणात उडी घेत सरकारला धारेवर धरले आहे. मंगळवारी या सगळ्या प्रकरणी ‘इंडियन एक्सप्रेस’कडून सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधण्यात आला. “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य करण्याचा सरकारचा कोणताही मानस नाही, पण सरकारने परीक्षेतील घोळ मान्य केला असून, जबाबदारीपासून अजिबात पळ काढलेला नाही”, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
वाद निर्माण न करण्याचे आवाहन
“काहीतरी चूक होतेय, आम्ही हे ऑन रेकॉर्ड सांगितले आहे की, आम्ही जबाबदारी स्वीकारली आहे, आणि आम्ही जबाबदारीपासून पळ काढलेला नाही”, असे अधिकारी एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले. दरम्यान, “जुने विषय खोदून काढण्यापेक्षा शैक्षणिक वर्ष व्यवस्थित कसे पार पडेल याकडे लक्ष द्यायला हवं विनाकारण सरकारने निराकारण केलेल्या विषयावरुन वाद निर्माण करु नये,” असे स्पष्टीकरण अधिकाऱ्याने दिल्याचे एक्सप्रेसच्या वृत्तात पुढे म्हटले आहे. नीट, सीयुईटी आणि जेईई या प्रवेश परीक्षांनंतर प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरु झाल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे.
आंदोलनाबाबत उपस्थित केले प्रश्न
“दिल्ली विद्यापीठात ७२,००० विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला असून, प्रवेश प्रक्रिया सुरळीत झाल्याचे दिसून येते”, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हटले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्यांचा परीक्षेशी थेट संबंध नसल्याचा दावा देखील अधिकाऱ्याने केला आहे. “आम्ही असे म्हणत नाही की आंदोलन करु नका, लोकशाही प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. पण, आंदोलनाच्या माध्यमातून मुद्दा कोण उपस्थित करतंय, तो कशा पद्धतीने उपस्थित केला जात आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? हे वेगळे प्रश्न आहेत”, असे दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे.
प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय असल्याचा पुनरुच्चार
प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय असल्याचा पुनरुच्चार या अधिकाऱ्यांनी केला. राजकीय दबवांना आम्ही बळी पडायला हवं का? सरकारने अगोदरच जबाबदारी स्वीकारली आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. व्यवस्थेत विश्वासू लोक आहेत, आम्ही पेपर माफीया नाही, आम्ही पेपरफुटीही लपवली नाही, आम्ही जबाबदारी स्वीकारुन त्यावर तोडगाही काढला, असे अधिकऱ्याने पुढे सांगितले.
