दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक २०२६ प्रकरणाच्या विरोधात दिल्लीतल्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने २० जूनपासून आंदोलन सुरू केलं होतं. देशभरात वाढत असलेले आंदोलन लक्षात घेता धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर करून राजीनामा देत असल्याची माहिती दिली.या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने जल्लोष केला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश

गेल्या एका महिन्यांपासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. आज (२५ जुलै) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं बोललं जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचा आनंद आहे. तसंच इतरही कारण आहेत. कारण २५ जुलै २०२६ हा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. कारण आपल्या देशातल्या लोकांनी आपला देश पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायचं ठरवलं आहे. कारण काही लोक देश आणि देशाचं संविधान उद्ध्वस्त करु पाहात होते. त्यांना जनतेने धडा शिकवला आहे. लोकांचा आवाज दाबणाऱ्या प्रत्येकाला आजची घटना हा एक धडा आहे. आज मला प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याचा अभिमान आहे. जे लोक जंतर-मंतरवर गेले आणि त्यांचा मला अभिमान आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा प्रत्येकासाठी धडा आहे. जे आंदोलन करत होते त्यांच्यावर सरकारने पॅलेट गन्स चालवल्या, अश्रूधुराचा मारा केला, लाठीमार केला. पण महात्मा गांधींची शिकवण हे तरुण आंदोलक विसरेलेले नाहीत. तरुणाई सरकारच्या अत्याचारापुढे झुकलं नाही, उलट तरुणांनी सरकारला गुडघ्यांवर आणलं. प्रत्येक सत्ताधाऱ्यासाठी हा धडा आहे, तु्म्हाला आत्तापासून येणाऱ्या काळातही देशातल्या जनतेचं तुम्हाला ऐकावंच लागेल हे विसरु नका.

प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके काय म्हणाले?

३६ दिवसांपासून दिल्लीत जंतर मंतरवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मागणीला यश आलं असून धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्री पदावरुन पायउतार झाले आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “आपण करुन दाखवलं”, असं म्हणत दीपके आणि आंदोलकांनी जंतर मंतरवर जल्लोष केला. “धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. हे काय म्हणत होते की, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत”, अशी प्रतिक्रिया दीपकेंनी दिली.