नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर शेकडो जेन-झी तरुण आंदोलकांनी जल्लोष केला. प्रधान यांच्या राजीनाम्याचे वृत्त जंतर-मंतरवर पोहोचताच कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके याच्या आनंदाला पारावार उरला नाही. दिपके यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याची घोषणा करताच आंदोलकांनी वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. क्षणार्धात जंतर-मंतर परिसर नृत्य, घोषणाबाजी आणि जल्लोषाने दुमदुमून गेला.
सीजेपीचा संस्थापक अभिजित दिपके याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र हातात घेऊन सलग ३६ दिवस चाललेल्या आंदोलनाच्या यशाचे श्रेय संविधानकर्त्यांना दिले. जंतर-मंतरवर सर्वत्र डॉ. आंबेडकरांची छायाचित्रे झळकत होती, अनेकांच्या हातात तिरंगा होता. आंदोलक एकमेकांना मिठी मारून विजय साजरा करत होते. ‘जीत गया भाई, जीत गया… हमारा संघर्ष जीत गया’, ‘युवा का संघर्ष जीत गया’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. ‘वंदे मातरम्’, ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’ या गीतांनी वातावरण भारावून गेले.
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला म्हणून मला नायक बनवू नका. ती चूक करू नका. देशाचे नुकसान वारंवार एकाच व्यक्तीला नायक बनवण्याच्या प्रवृत्तीमुळे झाले आहे. हा विजय एखाद्या व्यक्तीचा नसून हजारो विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांच्या सामूहिक संघर्षाचा आहे. – अभिजित दिपके, सीजेपीचे संस्थापक
…तर जग नक्कीच झुकते
दिपके म्हणाले, ‘हे सरकार राजीनामे घेत नाही, असे म्हटले जायचे. पण आम्ही म्हणतो, जर कोणामध्ये जगाला झुकवण्याची ताकद असेल, तर जग नक्कीच झुकते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे लोकशाही पद्धतीने उभारलेल्या आंदोलनाची ताकद देशाने पाहिली आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याने आंदोलन संपलेले नाही. परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि इतर मागण्यांसाठीचा संघर्ष सुरूच राहील. हा राजीनामा या गोष्टीचा पुरावा आहे की, जर तुम्ही घाबरलात नाही आणि या सरकारपुढे झुकलात नाही, तर कोणालाही राजीनामा द्यायला भाग पाडू शकता. ही लोकशाही आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.’
आंदोलनाचे रूपांतर उत्सवी सोहळ्यात
आंदोलन यशस्वी झाल्याचे कळताच दिल्लीतील रस्त्यांचा ओघ जंतर-मंतरकडे वळला. टॉलस्टॉय रोड, जनपथ आणि परिसरातील इतर रस्त्यांवरून तरुण-तरुणींचे लोंढे जंतर-मंतरकडे निघाले होते. सुट्टीचा दिवस असल्याने जेन-झीची उपस्थिती आणखी वाढली होती. तरुण-तरुणींबरोबरच तान्ह्या मुलांना घेऊन महिला मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर दाखल झाल्या होत्या. सात-आठ वर्षांच्या मुलांना पालक खांद्यावर बसवून तेथील वातावरण दाखवत होते. आंदोलन संपले असले तरी रात्री उशिरापर्यंत गर्दी रेंगाळली होती. आंदोलकांच्या चेहर्यांवरील ताण नाहीसा झाला होता. अनेक तरुण गाणी गात होते. आंदोलनाचे रूपांतर जणू एखाद्या उत्सवी सोहळ्यात झाल्याचे चित्र होते.
