Dhruv Rathee Detained Truth update : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी याचीही आज सुटका करण्यात आली. त्याला शनिवारी सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आंदोलनात जाण्याआधीच त्याला ताब्यात घेतल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. आज त्याला सकाळीच पोलिसांनी सोडून दिलं. त्यानंतर त्याने आता त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मी भारतीय नागरिक

ध्रुव राठीने त्याचा भारतीय पासपोर्ट दाखवला. तो म्हणाला, मी भारतीय नागरिक आहे, होतो आणि यापुढेही राहीन. मी परदेशी नागरिक असून मला आंदोलनाचा अधिकार नाही, असं मीडियाने सांगितलं. पण हे खोटं आहे. मलाही तितकेच अधिकार आहेत जितके सामान्य नागरिकांना आहेत.”

मला अटक नाही, किडनॅप केलं होतं

“१० ऑक्टोबर सकाळी ७ वाजता मी माझ्या घरातील बेडरुममध्ये झोपलो होतो. माझ्या आईने सकाळी उठून दरावाजा उघडला. घराबाहेर साध्या वेशातील माणसं उभी होती. माझ्या आईला धक्का मारून ते घरात शिरले. ती जोरात ओरडलीही. पण हे लोक माझ्या घरात चारही बाजूंनी पसरले. त्यांनी माझ्या बेडरुमचा दरवाजा उघडला तेव्हा मला जाग आली. मी काहीही प्रतिक्रिया देण्याआधीच त्यांनी मला किडनॅप केलं. त्यांनी मला ताब्यात किंवा अटक केली नाही. त्यांनी मला किडनॅप केलं. त्यांनी कायदेशीररित्या ताब्यात घेतलं असतं तर मी आनंदाने गेलो असतो”, अशी माहिती ध्रुव राठीने दिली.

मला चप्पलही घालू दिली नाही

“बाहेर गेल्यावर मला कळलं की ५० हून अधिक लोक होते. पोलीस किंवा इतर संस्थेचे लोक होते. मी बाहेर आलो, माझी झोप उडाली. मी त्यांना विचारायच्या आतच त्यांनी मला खेचत नेलं. एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातात त्याप्रमाणे त्यांनी मला घसरत नेलं. मला चप्पल घालायलाही दिलं नाही. जीपमध्ये टाकून मला एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात नेलं आलं. माझा, आई वडिलांचा फोन घेण्यात आला. माझ्या वकिलांनाही भेटण्याची परवानगी दिली नाही. २० तासांपर्यंत त्यांनी मला ताब्यात ठेवलं. त्यांनी सांगितलं की मला अटक वगैरे केलेली नाही, पण त्यांनी मला किडनॅप केलं होतं”, अशी आपबिती त्याने सांगितली.

“लोकशाहीच्या देशात असं कधी झालंय का? एक सामान्य नागरिकाने कोणताही कायदा तोडलेला नसताना त्याला घरातून उचललं जातं? असं कधीच लोकशाहीच्या देशात घडत नाही. मोदींनी हुकूमशाही चालवली आहे. माझ्या आजूबाजूला १५ जणांचा पहारा आहे. त्यांनी मला नजरकैदेत ठेवलं आहे”, असंही तो म्हणाले. पुढे त्याने हुकुमशाहीमध्ये हुकूमशाहाचाही असाच अंत होतो, असाही इशारा दिला.