Dhruv Rathee Bengaluru Protest: एसआयआर प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे गुरुवारी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी, अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राज तसेच ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह इतर लोक सहभागी झाले होते. या आंदोलनाचा भाग म्हणून ‘जनता न्यायालय’ भरवण्यात आले. यामध्ये कर्नाटकातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी मतदार यादीतून नावे वगळल्याप्रकरणी तीव्र आक्षेप नोंदवले. यानंतर आंदोलकांनी ‘चप्पल’ दाखवून निषेधही व्यक्त केला.

संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदींचा त्रास

आंदोलनात सहभागी झालेल्या ध्रुव राठी यांनी यावेळी म्हटले, “मी पहिल्यांदाच आंदोलनात सहभागी झालो आहे. मी काल बंगळुरूत आलो, तेव्हा सोशल मीडियावर ध्रुव राठी सरकार उलथवून लावायला येत आहे, अशा पोस्ट व्हायरल झाल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत असेल की, माझा त्यांच्याशी काही वैयक्तिक वाद आहे; मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, संपूर्ण देशालाच आता त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.” द प्रिंट या वृत्त संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राठी म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तोंडावर ७० लाख मतदारांची नावे अचानक कशी वगळली गेली? याचे उत्तर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारच देऊ शकतात. भाजप समर्थकांना कदाचित ‘मत चोरी’च्या आरोपांवर विश्वास बसत नसेल, पण मतदानाचा हक्क हा प्रत्येकाचा घटनादत्त अधिकार आहे, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे.”

बिहारमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच ४० लाख वगळलेल्या नावांची माहिती उघड करण्यात आली, असा आरोप करत त्यांनी उत्तर प्रदेशात १४ लाख नावे अचानक वाढवली गेल्याचा दावा केला. या वेळी राठी यांनी कर्नाटकातील १०० मतदान केंद्रांमधील त्रुटींवर आधारित अभ्यास अहवालही प्रसिद्ध केला.

‘देशात हुकूमशाही खपवून घेणार नाही’

दरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. “जिवंत मतदारांना कागदोपत्री मृत दाखवून नावे वगळली जात आहेत. हा एकप्रकारे लोकशाहीचा खून आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ ही केवळ घोषणा असून ‘एक देश, एक पक्ष’ आणण्याचा यामागे डाव आहे. देशभरात प्राथमिक मसुद्यातून तब्बल १३ कोटी नावे वगळण्यात आली,” असा गंभीर आरोप दिपके यांनी केला.

“जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील”, असा इशाराही त्यांनी दिला.