Elephant Attack in Nepal Dhurbe Elephant Chitwan: हिंस्र झालेल्या एका हत्तीने नेपाळमध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, १४ वर्षांपूर्वी याच कुटुंबातील दोन सदस्यांना हत्तीने चिरडल्यानंतर उर्वरित कुटुंबातील लोक दूरवर जाऊन राहू लागले होते. तरीही या हत्तीने १४ वर्षांनी त्यांना शोधून याच कुटुंबातील आणखी दोन सदस्यांचा जीव घेतला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून हत्तीबद्दल परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
नेपाळमधील चितवन राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या माडी शहरातील शनीचरा बोते यांच्या घरातील दोन सदस्यांचा २०१२ मध्ये धुर्बे नावाच्या हत्तीने बळी घेतला होता. काठमांडू पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, धुर्बे या हत्तीने २०१२ साली शनीचरा यांच्या आई-वडिलांना चिरडून मारले होते.
आई-वडिलांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर शनीचरा बोते यांनी माडी शहरापासून १७ किमी दूर रेऊ आणि राप्ती नदीच्या पलीकडे जगतपूर या गावी राहायला गेले. आपल्या कुटुंबासह ते तिथेच स्थायिक झाले. हे गाव चितवन राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासूनही बरेच दूर आहे. या १४ वर्षांत त्यांना वाटले की, आपल्यावरील वन्य प्राणयाचे संकट टळले. मात्र धुर्बे हत्तीने या गावातही धडक दिली आणि सोमवारी त्याने शनीचरा यांच्या कुटुंबातील आणखी दोघांचा जीव घेतला.
जगतपूरमध्ये धुर्बेची धडक
काठमांडू पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, धुर्बेने जगतपूरमधील शनीचरा बोते यांच्या घराची भिंत पाडली आणि घरातील त्यांची सून आशिका बोते (वय २५) आणि त्यांचा चार वर्षांचा नातू भारत बोतेला सोंडून आवळून त्यांचा जीव घेतला. काठमांडू पोस्टला दिलेल्या प्रतिक्रियेत शनीचरा बोते म्हणाले की, इतकी मोठी नदी पार करून आम्ही दूरवर आल्यामुळे आम्हाला वाटले की, हत्तीपासून आम्ही सुरक्षित झालो आहोत. मात्र तसे घडले नाही.
इतक्या वर्षांनंतर तोच हत्ती आम्हाला कसा काय शोधतो आणि आमच्या डोळ्यादेखत घरावर हल्ला करून माझ्या सुनेला आणि चिमुकल्या नातूला संपवतो, हे सर्वच अनाकलनीय आहे. आता आम्ही अजून कुठे निघून जावे, असा प्रश्न पडला आहे, अशीही प्रतिक्रिया शनीचरा बोते यांनी दिली.
१६ वर्षांत २५ जणांचा बळी
धुर्बे हा हत्ती गेल्या काही वर्षांपासून नेपाळसाठी डोकेदुखी ठरत आहे. हिंस्र झालेल्या या हत्तीने यापूर्वीही अनेकांना जखमी केल्याची माहिती मिळत आहे. चितवन राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१० पासून या हत्तीने जवळपास २५ लोकांना मारले आहे. या घटनेपूर्वी धुर्बेने २३ जणांचा बळी घेतला होता, अशी माहिती चितवन राष्ट्रीय उद्यानाचे अबिनाश थापा मगर यांनी काठमांडू पोस्टला दिली.
