मुंबई : जॉर्जिया येथील कॉकसस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी गेलेला अहमदाबादमधील विद्यार्थी १४ मे पासून अचानक गायब झाला आहे. या तरुणासह राहत असलेल्या सहकाऱ्यांकडून त्याचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. त्यामुळे तो १४ मे रोजी भारतामध्ये परत येण्यासाठी निघाला होता. मात्र दुपारी २.३० वाजल्यापासून त्याचा फोन बंद लागत असून, त्याचा कोणताच पत्ता नसल्याचे त्याच्या वडिलांकडून सांगण्यात आले.

ध्वनित राजदीप हा कॉकसस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. तो चौथ्या वर्षामध्ये नवव्या सत्रामध्ये शिक्षण घेत होता. ध्वनित हा अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. ध्वनी हा ज्या रूममध्ये राहत होता. तेथील त्याच्या सहकाऱ्यांकडून त्याला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्याने आपले राहते ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याने काही दिवस अहमदाबादला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याचे वडील मयूर राजदीप यांनी त्याला विमानाचे तिकिट काढूनही दिले होते. अहमदाबादला येण्यापूर्वी त्याने नवीन घर घेत तेथे अर्धे सामान हलविले होते. त्यानंतर उर्वरित सामान आणण्यासाठी तो १४ मे रोजी जुन्या ठिकाणी गेला होता. त्यावेळी तेथील त्याच्या सहकाऱ्यांशी त्याचा वाद झाला होता. यावेळी तेथील सहकाऱ्यांनी त्याला मारहाण करत त्याच्याकडील पैसे काढून घेतले. तेथून निघाल्यानंतर दुपारी ध्वनित विमानतळाच्या दिशेन निघाला. मात्र दुपारी १.३० वाजल्यापासून त्याचा फोन अचानक बंद झाला. त्यानंतर त्याच्या त्याच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे ध्वनीचे वडील मयूर राजदीप यांनी सांगितले.

ध्वनित राजदीपशी संपर्क होत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी तातडीने भारतीय दूतावासाला याची माहिती दिली. तसेच ध्वनित राजदीपचा मोठा भाऊ तातडीने कॅनडामधून जॉर्जियाला पोहचून त्याने स्थानिक पोलीस प्रशासन, विद्यापीठ प्रशासनाला याबाबत माहिती दिली. मात्र ध्वनीत बेपत्ता होऊन १० दिवस उलटले तरी जॉर्जिया पोलिस तपास सुरू असल्याचे सांगत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. भारतीय दूतावासाने आम्हाला सहकार्य केले असून पोलिसांकडून त्यांनी तपासाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे मयूर राजदीप यांनी सांगितले.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत कुटुंबीयांनी अहमदाबादचे खासदार दिनेश मकवाना यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. त्यानंतर खासदारांनी परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष वेधून या प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

अभ्यासात हुशार, शांत स्वभावाचा विद्यार्थी

ध्वनित राजदीप हा अत्यंत शांत स्वभावाचा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारा विद्यार्थी होता. तो लोकांमध्ये फारसा मिसळत नसे आणि आपला बहुतेक वेळ वैद्यकीय संशोधन आणि शैक्षणिक कामांमध्ये घालवत असे. तो वैद्यकीय संशोधनविषयक लेखही लिहित होता. महाविद्यालयामध्ये त्याच्याविरोधात कधीही कोणतीही तक्रार किंवा अनुशासनभंगाची घटना घडली नसल्याचेही मयूर राजदीप यांनी सांगितले.