North Korea Kim Jong Un Successor : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन हे कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. किम जोंग उन यांच्या कोणत्याही निर्णयांची जगभरात चर्चा असते. आता किम जोंग उन यांचा उत्तराधिकारी ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. किम जोंग उन यांचा उत्तराधिकारी कोण असणार याबाबत अनेकदा वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. पण आता उत्तर कोरियाचं पुढील नेतृत्व कोणाकडे असणार? याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.
हुकूमशाह किम जोंग-उन हे त्यांच्या मुलीकडे देशाची सूत्रे देण्याची तयारीत आहेत, म्हणजे उत्तर कोरियाची पुढची हुकूमशाह ही किम जोंग यांची मुलगी असेल. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था, नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसने (एनआयएस) आज त्यांच्या संसद सदस्यांबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान ही माहिती जाहीर केल्याचं बीबीसीने एका वृत्तात म्हटलं आहे. मात्र, असं असलं तरी त्या संदर्भात उत्तर कोरियाकडून अधिकृत माहिती अद्याप जारी करण्यात आलेली नाही.
वृत्तानुसार, किम जोंग-उन हे यांनी त्यांची मुलगी किम जू-ए हिला आपला पुढचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. दरम्यान, किम जोंग उन यांनी मुलगी किम जू ए हिला त्यांच्या अनेक दौऱ्यात सहभागी केलं होतं. एनआयएसने किम जोंग उन यांचा उत्तराधिकारी ठरल्याचं मूल्यांकन करताना त्यांनी अधिकृत कार्यक्रमांमध्ये किम जू ए यांची वाढती प्रमुख सार्वजनिक उपस्थिती विचारात घेतली आहे.
किम जू ए कोण आहे?
किम जू ए नेमकी किती वर्षांची आहे, याबाबत कुठलीही माहिती नाही. मात्र, दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार ती साधारण १३ वर्षांची आहे आणि साधारण २०२२ मध्ये किम जु-ए ही पहिल्यांदाच जगासमोर आली. नोव्हेंबर २०२२ मध्ये किम जोंग-उन यांनी पहिल्यांदा त्यांच्या मुलीची सर्वांसमोर ओळख करून दिली होती. त्यानंतर किम जु-ए अनेक माध्यमांवर वारंवार दिसू लागली.
देशाच्या लष्करी आणि औपचारिक कार्यक्रमांमध्ये ती नेहमीच आपल्या वडिलांबरोबर सार्वजनिक मंचावर उपस्थित असते. किम जोंग-उन यांनी उत्तर कोरियामधील माध्यमांवर कडक निर्बंध घातलेले आहेत, त्यामुळे प्रसारमाध्यमांनी कधीही किम जू-एचे नाव घेतलेले नाही. ती केवळ नेत्याची सर्वात लाडकी मुलगी किंवा आदरणीय कन्या या नावानेच ओळखली जाते.
किम जू ए उत्तर कोरियाची हुकूमशहा होणार?
२०२३ मध्ये उत्तर कोरियातील एका भव्य लष्करी परेडदरम्यानचा एक प्रसंग विशेष लक्षवेधी ठरला. एका सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याने किम जू एच्या समोर गुडघे टेकून आदर व्यक्त केला. याआधी हा आदर केवळ किम जोंग-उन यांनाच दिला जात होता. किम जू एची सार्वजनिक मंचावरील उपस्थिती वाढली असल्याने ती उत्तर कोरियाची पुढील हुकूमशाह होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

