scorecardresearch

“कोणी मारलं हे मी पाहिलं नाही”; भाजपा आमदाराने मारहाण केल्यानंतर अधिकाऱ्याने बदलला जबाब

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजवर्गीय यांचे पुत्र आकाश यांनी अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली होती

Official Beaten Up by BJP MLA Akash Vijayvargiya Changes Stance in Court
(फोटो सौजन्य -ANI)

इंदौरचे भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी मारहाण केलेल्या पालिका अधिकाऱ्याने या प्रकरणात न्यायालयात सुनावणीदरम्यान आपला जबाब बदलला आहे. जून २०१९ मध्ये आकाश विजयवर्गीय यांनी अधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली होती. आता जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पालिकेच्या अधिकाऱ्याने आपला जबाब बदलला आहे. २०१९ मध्ये एका व्हिडिओमध्ये भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय हे बॅटने मारहाण करताना दिसत होते. आकाश हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजवर्गीय यांचे पुत्र आहेत.

या प्रकरणानुसार, जीर्ण घरासह इतर घरे पाडण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी इंदूरच्या गंजी कंपाऊंडमध्ये पोहोचले होते. त्याचवेळी इंदूर विधानसभा-३ चे आमदार आकाश विजयवर्गीय हेही त्यांच्या समर्थकांसह तेथे पोहोचले. अधिकाऱ्यांशी झालेल्या वादानंतर त्यांनी मनपाचे झोनल अधिकारी धीरेंद्र बैस यांना क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली होती.

याप्रकरणी व्यास यांनी एमजी रोड पोलिसांकडे तक्रार केली होती. व्यास यांनी आपल्या जबाबात आमदार आकाश आणि त्यांच्या समर्थकांवर मारहाणीचा आरोप केला होता. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कमलनाथ यांच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. आकाश आणि त्यांच्या ११ समर्थकांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. या सर्वांना न्यायालयाने ११ जुलैपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. २९ जून रोजी त्यांना भोपाळ येथील विशेष न्यायालयातून जामीन मिळाला होता.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान धीरेंद्र बैस यांना न्यायालयात हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यास सांगितले असता, त्यांनी आपल्याला कोणी मारहाण केली हे माहित नसल्याचे सांगितले. यानंतर आकाश विजयवर्गीय यांच्यावर दाखल झालेला गुन्हा पूर्णपणे मिटला आहे.

“या घटनेच्या वेळी मी फोनवर बोलत होतो. मी मागे वळून पाहिलं तर आकाश विजयवर्गीय आणि इतर पाच जण हातात बॅट घेऊन उभे होते. मात्र, माझ्यावर कोणी हल्ला केला हे मी पाहिले नाही,” असे धीरेंद्र बैस इंदूर न्यायालयात म्हणाले. त्यामुळे आता बैस यांचे वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, , कैलाश विजयवर्गीय हे नेहमीच त्यांच्या उग्र राजकारणासाठी ओळखले जातात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण त्यांचा मुलगा आकाश हे सौम्य प्रतिमेचे नेते मानले जातात. कैलाश विजयवर्गीय यांच्या राजकारणामुळे अनेकदा इंदूर शहरातील स्थानिक अधिकाऱ्यांना त्याच्या रोषाला सामोरे जावे लागले.

आपल्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात इंदूरमधील एका भागात पाण्याच्या समस्येसाठी आंदोलन करण्यासाठी आलेल्या विजयवर्गीय यांनी हातात चप्पल उचलली होती. त्यानंतरही त्यांनी अधिकाऱ्यांशी बाचाबाची करण्याचा प्रयत्न केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. इंदूरमध्ये फॅशन शो आयोजित करण्यावरूनही त्यांचा आणि त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यामध्ये बराच वाद झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Did not see who hit me indore official beaten up by bjp mla akash vijayvargiya changes stance in court abn

ताज्या बातम्या