Sourav Ganguly Clarification on Yusuf Pathan Resign Rumors: बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा दारूण पराभव झाला. ममता बॅनर्जी यांना त्यांच्याच भवानीपूर मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी पराभूत केले. निवडणुकीतील पराभवानंतर आता ममता बॅनर्जी यांचा पक्षही दुभंगला असून त्यात फूट पडण्याची चिन्ह आहेत. यानंतर ममता बॅनर्जी यांना लोकसभा पोटनिवडणुकीद्वारे संसदेत पाठवले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यासाठी सौरव गांगुलींच्या मध्यस्थीने माजी क्रिकेटपटू आणि बहारामपूरचे खासदार युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यासाठी राजी करण्यात येत असल्याची आवई उठली होती. यावर आता खुद्द सौरव गांगुली यांनीच पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे.

एका बंगाली दैनिकाच्या वृत्तानंतर ही चर्चा सार्वजनिक झाली. युसुफ पठाणची मनधरणी करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलींची मदत घेतली जाईल, अशी चर्चा होती. मात्र सौरव गांगुली यांनी ही चर्चा स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. ‘सत्याकडे कानाडोळा करून बेजबाबदारपणे पसरवलेली चर्चा’, अशी टीका गांगुली यांनी या टीकेवर केली.

बंगाली दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, ममता बॅनर्जी यांच्या राजकीय भवितव्याची चिंता पक्षातील काही नेत्यांना वाटत आहे. स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पुनरागमन करण्यासाठी ममता बॅनर्जी यांना संसदेत पाठवले जाऊ शकते. यासाठी त्या लोकसभेचा मार्ग स्वीकारू शकतात, अशी माहिती वृत्तात देण्यात आली होती.

नेमके प्रकरण काय आहे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वृत्तात म्हटले की, तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांची नजर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहारामपूर लोकसभा मतदारसंघावर आहे. २०२४ साली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात याठिकाणी माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणला उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत पठाण यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला.

Who is Ritabrata Banerjee
ममता बॅनर्जींचा पक्ष फोडणारे ऋतब्रता बॅनर्जी कोण आहेत? तृणमूलचे ५९ आमदार कसे फोडले? शिंदे पॅटर्नची का होतेय चर्चा? (बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

बहारामपूर लोकसभेत मुस्लीम समाजाची लोकसंख्या ५० ते ५२ टक्के आहे. हा टीएमसीचा प्रमुख मतदार वर्ग आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ममता बॅनर्जींसाठी सुरक्षित मानला जात आहे.

वृत्तात म्हटल्यानुसार, टीएमसीने गांगुली यांच्याशी संपर्क साधून ममता बॅनर्जींचा संदेश पठाण पर्यंत पोहोचवून त्यांना बहारामपूरची जागा रिक्त करण्याची विनंती केली. जेणेकरून या मतदारसंघात पोटनिवडणूक घेता येईल.

सौरव गांगुली आणि युसूफ पठाण हे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट राइडर्स (केकेआर) या संघासाठी थोड्या कालावधीसाठी एकत्र खेळले होते. या वृत्तात पुढे असेही म्हटले होते की, पठाणने हा कथित प्रस्ताव नाकारला.

तृणमूल काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांमध्ये मोठी फूट पडण्याची चर्चा असतानाच हे वृत्त समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आमदार ऋताब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटात तृणमूलचे २३ खासदार सामील झालेले आहेत.

सौरव गांगुली यांनी काय म्हटले?

या वृत्तामुळे बंगालमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली. यानंतर गांगुली यांनी शनिवारी एक सविस्तर निवेदन जारी करून हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले. माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष गांगुली यांनी स्पष्ट केले की, त्यांनी राजकीय बाबींमध्ये कधीही सहभाग घेतलेला नाही. अशा सनसनाटी बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी तथ्यांची पडताळणी करायला हवी होती.

“या बातमीतील आरोप माझ्याशी संबंधित आहेत. पण ते सत्याकडे कानाडोळा करून बिनबुडाच्या आधारावर रचलेले आहेत. ममता बॅनर्जी यांनी युसूफ पठाणपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवण्याची कोणतीही विनंती माझ्याकडे केली नाही. तसेच या विषयासंदर्भात आपण पठाणशी कधीही संपर्क साधला नाही”, असे स्पष्टीकरण गांगुली यांनी दिले.

sourav ganguli letter
माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत राजकीय वादावर स्पष्टीकरण दिले आहे.

सौरव गांगुली पुढे म्हणाले, “मी युसूफ पठाणशी कोणताही संदेश पोहोचवण्यासाठी संपर्क साधलेला नाही. यामुळे या बातमीत आरोप केल्याप्रमाणे युसूफ पठाण यांनी या घटनेवर प्रतिसाद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

याचबरोबर खासदार पठाण आणि तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांनी या बातमीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

ममता बॅनर्जींचा राजकीयदृष्ट्या कठीण काळ

तब्बल तीन वेळा पश्चिम बंगालची सत्ता काबीज करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. २९४ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत टीएमसीचे केवळ ८० आमदार निवडून आले. तसेच स्वतः ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला.

Mamata Banerjee loses Bhawanipur Seat to Suvendu Adhikari
१९००० मतांच्या आघाडीनंतरही दारुण पराभव; भाजपाच्या ‘चक्रव्यूहात’ ममता बॅनर्जी कशा अडकल्या?

तसेच ८० आमदारांपैकी तब्बल ५८ आमदारांनी बंड केले असून पक्षातून निलंबित केलेले आमदार ऋताब्रता बॅनर्जी यांना विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. तृणमूल काँग्रेसने मात्र या निर्णयाला अवैध म्हटले असून या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्याची योजना आखली आहे.