Impact of Iran Israel War on Indian market: अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात २८ फेब्रुवारीला पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले. जवळपास दोन महिन्यांपासून कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीसारखा जागतिक पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील जलमार्ग बाधित झाला. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्या काही आठवड्यातच भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा भासू लागला होता. आता हा पुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला असला तरी युद्ध लांबल्यामुळे इतर दैनंदिन वस्तूंवर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. डाएट कोक, पॅकेज्ड फूड आणि इतर वस्तूंचा कच्चा माल उपलब्ध होत नसल्याची तक्रार समोर आली आहे.

जागतिक ॲल्युमिनियम उत्पादनापैकी सुमारे ९ टक्के उत्पादन आखाती प्रदेशातून होते. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीवर घातलेल्या बंदीमुळे ॲल्युमिनियम कॅनच्या पुरवठ्यामध्ये व्यत्यय आला असून त्याचा थेट परिणाम डाएट कोकच्या विक्रीला बसला आहे.

भारतात सॉफ्ट ड्रिंकची विक्री प्लास्टिक बाटली आणि कॅन अशा दोन्ही स्वरुपात होत असली तरी डाएट कोकची विक्री मात्र कॅनमधूनच होते. कोका-कोलाच्या दोन वितरकांनी बुधवारी रॉयटर्सला सांगितले की, युद्धामुळे निर्माण झालेल्या कॅनच्या तुटवड्यामुळे कंपनीच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून आम्ही काही ऑर्डरची पूर्तता करण्यास असमर्थ ठरत आहोत.

भारतात गेल्या काही काळात डाएट कोकची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२४-२५ मध्ये कंपनीने ५० अब्ज रुपयांची (५३३ दशलक्ष डॉलर्स) विक्री नोंदवली. २०२१ पासूनची ही सर्वाधिक विक्री होती. या क्षेत्रातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॅन्सच्या पुरवठ्याला विलंब झाल्यामुळे डाएट कोकचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच इंधनाच्या तुटवड्यामुळे भारतातील कॅन आणि बाटल्यांचे उत्पादनही महागले आहे.

बिअर आणि बाटलीबंद पेयांवर परिणाम

इराण युद्धामुळे भारतातील मद्यनिर्मितीचा खर्च वाढला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे मार्च महिन्यात उत्पादनावर परिणाम झाला होता. तसेच वाढलेल्या ऊर्जा दरांमुळे काचेच्या बाटल्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली. ॲल्युमिनियमची आयात घटल्यामुळे कॅनबंद बिअरच्या उत्पादनावरही परिणाम झाला. मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी हा अडथळा असाच कायम राहिल्यास येत्या काही महिन्यांत दरवाढ करण्याचा इशारा दिला होता.

हेनेकेन, ॲनहायझर-बुश इनबेव्ह आणि कार्ल्सबर्ग यांसारख्या जागतिक मद्यनिर्मात्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रूअर्स असोसिएशन ऑफ इंडियाने मार्चमध्ये रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितले की, काचेच्या बाटल्यांच्या किमती सुमारे २० टक्क्यांनी वाढल्या आहेत, कागदी कार्टनचे दर दुप्पट झाले आहेत, तसेच लेबल्स आणि टेप यांसारख्या इतर पॅकेजिंग साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. भट्ट्या आणि उत्पादन प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी गॅस आवश्यक आहे आणि त्याच्या तुटवड्यामुळे काचेच्या बाटल्या बनवणाऱ्या अनेक उत्पादकांना आपले कामकाज अंशतः किंवा पूर्णपणे थांबवावे लागले आहे.

पॅकेज्ड फूड

ॲल्युमिनियम आणि ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पॅकेज्ड फूड क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. कॅन्स, कार्टन आणि काच अशा पॅकेजिंग साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादकांना आपल्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ करणे भाग पडत आहे. तर काही कंपन्या कमी क्षमतेने कार्यरत आहेत. याचा परिणाम स्नॅक्स, ज्यूस, सॉस आणि दुग्धजन्य पदार्थांसारख्या दैनंदिन वस्तूंवर होत आहे.

सौंदर्य प्रसाधने आणि पर्सनल केअर उत्पादने महागली

प्लास्टिक पॅकेजिंग, कच्चा माल आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे सौंदर्यप्रसाधन उद्योगालाही तोटा होत आहे. वितरणातील विलंब आणि खर्चात झालेल्या वाढीमुळे त्याचा बोजा आपसूकच ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो. शॅम्पू, क्रीम आणि सौंदर्यप्रसाधनासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू यामुळे महाग होण्याची शक्यता आहे.

ऑटोमोबाइल्स क्षेत्रालाही फटका

इराण युद्धाचा भारतातील वाहन उत्पादनालाही फटका बसला आहे. उत्पादनाचा वाढता खर्च आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे या क्षेत्रावर संकट ओढवले आहे. सुटे भाग, वाहतूक आणि कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत. ज्यामुळे उत्पादनाचे वेळापत्रक कोलमडले असून त्याचा परिणाम किमतीवर होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तांदूळ, गहू आणि खाद्य तेलाच्या उत्पादनावर प्रश्नचिन्ह

इराण युद्धाचा फक्त कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंनाच नाही तर कृषी क्षेत्रालाही फटका बसत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक खर्चात होणारी वाढ, तसेच खतांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पिकांच्या पेरणीवर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, खतांचा तुटवडा आणि इंधन दरवाढीमुळे तांदूळ, गहू, साखर आणि खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.