सार्वत्रिक निवडणुकीचा अखेरचा मोठा, सातवा टप्पा बुधवारी पार पडत असताना आणि या टप्प्यात नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह अशा दिग्गजांचे राजकीय भवितव्य पणाला लागले असताना प्रचारातील सूर अधिकच टिपेला गेला असून नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस, तृणमूल, राजद, नॅशनल कॉन्फरन्स असा लढा अधिकच उग्र झाला आहे. यामुळे भाजपच्या प्रचारातही आणि विरोधकांच्या प्रचारातही नरेंद्र मोदी यांचेच नाव आघाडीवर आहे!
नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाक् युद्ध अधिक तीव्र झाले आहे. बिगर बंगाली नागरिकांकडे दुर्लक्ष करून ममता बांगलादेशी नागरिकांचे स्वागत करत आहेत अशी टीका मोदींनी केली होती. त्यावर संतापलेल्या ममतादिदींनी मोदी यांना ‘दंगलीचे शिल्पकार’ ही पदवी बहाल करत सैतानाची उपमा दिली. पश्चिम बंगालमधील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मोदी यांना फूट पाडायची आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदी जर पंतप्रधान झाले तर देश अंध:कारात बुडेल, अशी टीकाही त्यांनी केली.
मोदींनी पश्चिम बंगाल सरकारवर कुशासनाचा आरोप केला होता. मात्र दंगलीच्या शिल्पकाराकडून आम्हाला सुशासनाचे धडे नको आहेत अशा शब्दात ममतांनी फटकारले. आम्ही जाती-धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, असे उत्तर त्यांनी दिले आहे.

मोदी पंतप्रधान झाल्याच्याच तोऱ्यात वावरत असून ते खरेच पंतप्रधान झाले तर देशासाठी ते मोठे दु:स्वप्न असेल. मोदी हे धर्मात फूट पाडणारे सैतान आहेत. भारतासारख्या बहुभाषक, बहुसांस्कृतिक देशाचे नेतृत्व ते करूच शकत नाहीत.
-ममता बॅनर्जी

राहुल याला मोदी कधी ‘नमुना’ म्हणतात, कधी विनोदवीर तर कधी शहजादा म्हणतात. देशाचा पंतप्रधान होऊ पाहणाऱ्या नेत्याने आधी पंतप्रधानपदाला साजेसे वागावे आणि हा बालिशपणा थांबवावा.  -प्रियंका गांधी

पंतप्रधान होऊ पाहणारे मोदी हे कसायालासुद्धा लाजवतील. मोदी हे तर कसायांचे कसाई आहेत. यात काही शंका आहे का? लालूप्रसाद यादव