Digital Arrest Cyber Fraud : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका ६२ वर्षीय शेतकऱ्याची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल १.३१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी शेतकऱ्यावर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना आर्थिक मदत केल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याला जवळपास दीड महिना भीती दाखवून पैसे देण्यास भाग पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

‘अरेस्ट वॉरंट निघाले आहे, कोणाला सांगू नका’

‘एफआयआर’नुसार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेतकऱ्याला अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदी आणि इंग्रजीत बोलत आपण मुंबई पोलिसातून बोलत असल्याचे सांगितले. पहलगाम हल्ल्यातील आरोपींशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात शेतकऱ्याचे नाव समोर आल्याचा दावा त्याने केला. मुंबई उच्च न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याचे सांगत जन्मठेप किंवा मृत्युदंडाची धमकीही दिली.

त्यानंतर मुंबई एटीएसचा तपास अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल केला. प्रकरण अत्यंत गोपनीय असल्याचे सांगून शेतकऱ्याला बंद खोलीत बसण्यास आणि कुटुंबीयांसह कोणालाही माहिती न देण्यास सांगण्यात आले. ४८ तासांत मुंबई एटीएससमोर हजर राहण्याचे निर्देशही दिल्याचा आरोप आहे. शेतकऱ्याच्या बँक खात्यांबाबत आणि पैशांच्या व्यवहारांबाबत चौकशी करण्यात आली. त्याला सुमारे दीड तास व्हिडीओ कॉलवर ठेवण्यात आले. दर तासाला ‘केस कोड आरएस ७४५७ आय एम सेफ अँड सिक्युर’ असा संदेश पाठवण्यासही सांगण्यात आले.

बँक ठेवी मोडण्यास आणि कर्ज घेण्यास भाग पाडले

२९ ऑगस्ट रोजी पोलिसांच्या गणवेशातील व्यक्तीने व्हॉट्सॲपवर मुंबई उच्च न्यायालयाचे अटक आणि खाते गोठवण्याचे आदेश असणारी कागदपत्रे दाखवून स्थानिक पोलिसांकडून अटक करवण्याची धमकी दिल्यानंतर, आयपीएस अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने प्रकरणाची सूत्रे हाती घेतली. सूचनांचे पालन केल्यास संरक्षण देण्याचे आश्वासनही दिले.

३१ ऑगस्ट रोजी शेतकऱ्याला स्वतःच्या आणि आईच्या मुदत ठेवींची माहिती देऊन त्या मोडण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ‘पैशांची पडताळणी’ करण्याच्या नावाखाली रिझर्व्ह बँकेच्या खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. बँकेने विचारणा केल्यास मुलीसाठी बंगळुरूमध्ये घर खरेदी करण्यासाठी पैसे पाठवत असल्याचे सांगण्याच्या सूचनाही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. शेतकऱ्याने कॅनरा बँकेच्या शाखेतून आरटीजीएसद्वारे ३५ लाख रुपये हैदराबादमधील खात्यात हस्तांतरित केले.

सोने गहाण ठेवले, इमारतीवरही कर्ज

यानंतर शेतकऱ्याच्या बँक लॉकरमधील सोन्याबाबत विचारणा करण्यात आली. सोने गहाण ठेवून पुत्तूर येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेतून साडेबावीस लाख रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. इतक्यावरच न थांबता, व्यावसायिक इमारत जप्त करण्याची धमकी देऊन ती गहाण ठेवण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्याने कर्नाटक बँकेकडून ७४ लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि दुसऱ्याच दिवशी आरटीजीएसद्वारे ही रक्कम हस्तांतरित केली. प्रत्येक व्यवहारानंतर संबंधित व्यक्तींकडून व्हॉट्सॲपवर पावत्या किंवा स्क्रीनशॉट पाठवले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मुलीच्या इशाऱ्यानंतर फसवणूक लक्षात आली

८ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीने डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची बातमी त्याला सांगितली. अशा फोन कॉलपासून सावध राहण्याचा इशाराही दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने मुलीला संपूर्ण प्रकार सांगितला आणि नंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी ओळख चोरी, दुसऱ्याचे रूप धारण करणे, बेकायदेशीरपणे रोखून धरणे, खंडणी, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी यांसह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार खात्यांमधून पैशांचा माग काढण्याचे आव्हान

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरुवातीला पैसे चार वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. ही खाती कोलकात्यातील ‘प्रियंका इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’, म्हैसूर जिल्ह्यातील पेरियापटनामधील ‘नंदी हार्डवेअर्स इलेक्ट्रिकल्स अँड पेंट्स’, हैदराबादमधील ‘डिझायर इंडिया प्रोजेक्ट्स’ आणि महाराष्ट्रातील ‘तन्मय ट्रेडर्स’ यांच्या नावावर असल्याचे सांगण्यात आले.

ही खाती ‘म्यूल अकाउंट्स’ म्हणजेच सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम पुढे हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाणारी खाती असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. खातेधारकांची माहिती मिळवण्यासाठी बँकांना पत्र लिहिले असून, पैशांचा पुढील प्रवास गुंतागुंतीचा असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.