कर्नाटक राज्यात सायबर गुन्हेगारीचा एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) बनावट अधिकारी बनून एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला तब्बल २४ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. कर्नाटकच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत वेगवेगळ्या राज्यांतून ६ आरोपींना अटक केली असून, सुमारे ५.४६ कोटी रुपये वाचवण्यात यश मिळवले आहे.
दुबईहून परतलेल्या शिक्षिकेला केले टार्गेट
फसवणूक झालेली महिला बेंगळुरूमधील शिवाजीनगर येथील रहिवासी असून, तिने पूर्वी दुबईत शिक्षिका म्हणून काम केले होते. अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मुलांकडे स्थायिक होण्यासाठी तिने बेंगळुरू आणि मुंबईतील काही मालमत्ता विकल्या होत्या. तिच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती मिळताच सायबर भामट्यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले.
काय आहे ‘डिजिटल अरेस्ट’ आणि कशी झाली फसवणूक?
आरोपींनी महिलेशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत, तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जोडलेले आहे, अशी भीती त्यांनी घातली. “तुम्ही डिजिटल अरेस्टखाली आहात,” असे सांगून आरोपींनी तिला घरातच कैद राहण्यास भाग पाडले. आणि ही माहिती कोणालाही न देण्याची धमकी दिली. जानेवारी ते मे दरम्यान सलग पाच महिने तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव ठेवण्यात आला. ‘फंड व्हेरिफिकेशन’ आणि ‘क्लिअरन्स’च्या नावाखाली आरोपींनी तिला २४ कोटी रुपये वेगवेगळ्या २२ बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करायला लावले.
बँकेच्या सतर्कतेमुळे फुटले भांडार!
इतकी मोठी रक्कम दिल्यानंतरही नराधमांची हाव संपली नाही. त्यांनी आणखी पैशांची मागणी केली. अखेर वैतागून ही महिला बेंगळुरूमधील एका खाजगी बँकेत १.३ किलो सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी गेली. बँकेच्या अधिकाऱ्यांना तिच्या या व्यवहाराबद्दल शंका आली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा तिची चौकशी केली, तेव्हा तिने स्वतः ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन समजावले की, कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही संकल्पना नाही. यानंतर महिलेने अधिकृत तक्रार नोंदवली.
६ राज्यांतून आरोपींना बेड्या, ५.४६ कोटी जप्त
कर्नाटक स्टेट सायबर कमांडने तपास चक्रे फिरवत देशातील विविध राज्यांतून ६ आरोपींना अटक केली. एन शिवज्ञानम (तमिळनाडू), अक्काच मल्लिक (मुंबई), पलक भाई पटेल, अमित नरेंद्र पटेल (गुजरात), ओमप्रकाश राजपूत (नवी दिल्ली) आणि गौरव कुमार (बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या मदतीने पोलिसांनी अनेक बँक खाती गोठवली असून, सुमारे ५ कोटी ४६ लाख रुपये सुरक्षित केले आहेत. पोलीस महासंचालक प्रणिब मोहंती यांनी सांगितले की, हे एक आंतरराज्यीय रॅकेट असून, उर्वरित रक्कम शोधण्यासाठी आणि इतर आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू आहे.
