उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातून सायबर गुन्हेगारीची एक अत्यंत हृदयद्रावक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय महिलेने सायबर भामट्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, मात्र तिच्या मृत्यूनंतरही या गुन्हेगारांचे फोन थांबले नाहीत. अंत्यसंस्कार सुरू असतानाच महिलेचा फोन वाजल्याने या संपूर्ण ‘डिजीटल अरेस्ट’ प्रकरणाचा उलगडा झाला.

नेमकी घटना काय?

बिजनोरच्या फरीदपूर भोगी गावात राहणाऱ्या मोनिकाने २७-२८ एप्रिलच्या रात्री गळफास लावून आत्महत्या केली. ज्यावेळी तिने हे टोकाचे पाऊल उचलले, त्यावेळी तिची ८ आणि ११ वर्षांची मुले तिच्या शेजारीच झोपलेली होती. सकाळी जेव्हा मुलांना जाग आली, तेव्हा त्यांना त्याची आई गळफास घेतेल्या अवस्थेत दिसली. सामाजिक दबावामुळे कुटुंबाने सुरुवातीला पोलिसांना कोणतीही माहिती न देता अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

स्मशानातील त्या फोन कॉलने गुपित उघडले

मोनिकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू असतानाच तिचा मोबाईल फोन वारंवार वाजू लागला. मोनिकाचा पुतण्या संयोग याने जेव्हा फोन उचलला, तेव्हा समोर एका व्यक्तीने पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल केला होता. स्वतःला ‘क्राईम ब्रांच’चा अधिकारी सांगणाऱ्या या व्यक्तीने मोनिकाशी बोलण्याचा हट्ट धरला. तिला धमकावण्यास सुरुवात केली. जेव्हा नातेवाईकांनी सांगितले की मोनिकाचा मृत्यू झाला आहे, तेव्हा त्या भामट्याने तिच्या पतीलाही तुरुंगात टाकण्याची धमकी दिली.

सुसाईड नोटमधून समोर आला छळ

या प्रकारानंतर संशय आल्याने कुटुंबाने घराची झडती घेतली. तिथे मोनिकाची एक डायरी सापडली, ज्यात तिने आपली सुसाईड नोट लिहिली होती. तिने नमूद केले होते की, काही अज्ञात लोक तिला फोन करून सतत धमकावत आहेत आणि ब्लॅकमेल करत आहेत.

तपास केला असता मोनिकाच्या फोनवर ५ वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेज आले होते. तिला सांगण्यात आले होते की, ती अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकली आहे. तिला २४ तास कॅमेऱ्यासमोर राहण्यास सांगून ‘डिजीटल अरेस्ट’ करण्यात आले होते. तिच्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात होती, अन्यथा तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली जात होती.

काय आहे ‘डिजीटल अरेस्ट’?

हा सायबर फसवणुकीचा एक असा प्रकार आहे, जिथे गुन्हेगार पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉलद्वारे ‘नजरकैदेत’ ठेवतात. कायद्याची भीती दाखवून त्यांना तासनतास एका जागी बसवून ठेवले जाते आणि नंतर केस रफादफा करण्यासाठी लाखो रुपयांची खंडणी उकळली जाते.

आकडेवारी काय सांगते?

२०२४ मध्ये भारतात डिजीटल अरेस्टच्या १,२३,६७२ केसेस नोंदवल्या गेल्या होत्या. २०२५ मध्ये सरकारी प्रयत्नांमुळे हे प्रमाण ८६ टक्क्यांनी घटून १७,२६४ वर आले. तथापि, तरीही २०२५ मध्ये नागरिकांनी ६४४ कोटी रुपये या स्कॅममध्ये गमावले आहेत. कर्नाटक राज्यात सर्वाधिक ३४६ गुन्ह्यांची ची नोंद झाली आहे.

सावधानता बाळगा

मोनिकाच्या पतीने आता बिजनोरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, कलम १०८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत. कोणताही पोलीस अधिकारी किंवा सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉलद्वारे कुणालाही अटक करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही. असा कॉल आल्यास घाबरून न जाता तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहान पोलीसांनी केले आहे.