भारतात मुस्लिम कधीच बहुसंख्याक बनू शकत नाहीत: दिग्विजय सिंह

सिंह यांनी दिल्लीत काँग्रेस, डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “सांप्रदायिक सद्भाव परिषदे”ला संबोधित केले.

Digvijaya Singh on UP's population control bill
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (photo indian express)

भारतातील अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाचा प्रजनन दर कमी होत असल्याचा दावा काँग्रेसचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी केला आहे. देशातील मुस्लिमांची लोकसंख्या कधीच इतकी वाढू शकत नाही की ते हिंदूंना मागे टाकून बहुसंख्याक बनतील. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोक याविषयी खोटा प्रचार करत असल्याचा आरोप करत मोहन भागवत यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान दिले. त्यांनी दिल्लीत काँग्रेस, डावे पक्ष आणि कामगार संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या “सांप्रदायिक सद्भाव परिषदे”ला संबोधित केले.

संघ परिवाराशी संबंधित लोकांवर टीका करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, “बहुपत्नीत्वामुळे लोकसंख्येत सातत्याने वाढ होऊन पुढील १० वर्षात देशातील मुस्लिम अल्पसंख्याकातून बहुसंख्याक होतील आणि बहुसंख्याक अल्पसंख्याक होतील, असा चुकीचा प्रचार केला जातोय. मी भागवत यांच्यासह संघाच्या प्रचारकांना आव्हान देतो की त्यांनी या विषयावर सार्वजनिक चर्चेसाठी यावं, या देशात मुस्लिम कधीही बहुसंख्याक होऊ शकत नाहीत हे मी सिद्ध करून दाखवेल.”

ते म्हणाले, “देशातील मुस्लिम समाजात जन्मदर कमी होतोय. असंही या महागाईच्या काळात एका सामान्य व्यक्तीला एका बायकोपासून जन्मलेल्या मुलांना वाढवणं कठीण जातंय. अशात कोणता मुसलमान चार बायका आणि त्यापासून होणाऱ्या मुलांचं पालनपोषण करू शकेल. संघ आणि भाजपच्या बोलण्यात आणि कृतीत फरक आहे,” असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला. रावणाचे १० चेहरे होते आणि त्याच्या प्रत्येक मुखातून वेगवेगळ्या गोष्टी बोलायचा, तीच अवस्था भाजपची आहे. एकीकडे संघाचे कार्यकर्ते विषारी बोलतात, तर दुसरीकडे हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच आहेत, असं संघप्रमुख भागवत म्हणतात.

“जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए सारखाच आहे, तर जातीय द्वेष का पसरवला जातोय आणि लव्ह जिहाद सारख्या मुद्यांची गरज काय आहे?” असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. इंग्रजांच्या लोकांना विभाजित करा आणि राज्य करा या धोरणानुसार देशात खोट्या गोष्टी पसरवून हिंदू आणि मुस्लिमांची विभागणी केली जात आहे, असा आरोप सिंह यांनी केला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Digvijay singh slams bjp rss over muslim majority in india hrc

ताज्या बातम्या