सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
या घोटाळ्यातील २४ आरोपींचा गूढरीत्या मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. त्याच वेळी आपण याचिका दाखल केली आहे, असे दिग्विजय सिंह यांनी वार्ताहरांना सांगितले. केवळ २४ नव्हे तर ४० जणांचा मृत्यू झाल्याचे काही वृत्तांत म्हटले आहे. सध्या या घोटाळ्याची चौकशी राज्य पोलीस दलाचे विशेष तपासपथक करीत असून त्यांनी या बाबत असमर्थता दर्शविली आहे. या प्रकरणात पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी, नागरी आणि न्यायालयीन सेवेतील अधिकारी इतकेच नव्हे तर भाजप आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांचाही सहभाग आहे, असे दिग्विजय सिंह म्हणाले. या प्रकरणात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचाही सहभाग आहे. त्यांच्या सभोवती अनेक गोष्टी घडत असतानाही त्यांना त्या दिसत नाहीत, असेही काँग्रेसचे नेते म्हणाले.