मध्य प्रदेश विधानसभा सचिवालयात १९९३ ते २००३ या कालावधीत करण्यात आलेल्या बेकायदेशीर भरतीबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आलेला असतानाच शनिवारी भाजपने त्यांच्यावर आणखी एक आरोप केला. भोपाळस्थित एका बिल्डरकडून दिग्विजयसिंह यांना कोटय़वधी रुपये मिळाल्याचा आरोप भाजपने केला.
दरम्यान, मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा आणि आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करावी, आपण चौकशीला तयार आहोत, असे दिग्विजयसिंह यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
भोपाळस्थित बिल्डरकडून प्राप्तिकर विभागाने २००८ मध्ये तीन डायऱ्या जप्त केल्या. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री’ आणि ‘माननीय मुख्यमंत्री’ यांना कोटय़वधी रुपये दिल्याची नोंद करण्यात आली आहे. ऑक्टोबर २००३ पूर्वी अनेकांना पैसे दिल्याची नोंदही करण्यात आली आहे. या कालावधीत दिग्विजयसिंह मुख्यमंत्री होते हे सर्वाना माहिती आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार चौहान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.डायरीतील नोंदी आपल्याच हस्ताक्षरातील आहेत आणि त्या आपणच केल्या आहेत हे संबंधित बिल्डरने मान्य केले आहे. याप्रकरणी बिल्डरला दंड ठोठावण्यात आला आहे, कारण त्या पैशांचा हिशेबच तो दाखवू शकला नाही.