काँग्रसेचे नेते दिग्विजय सिंह नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे नवा वाद ओढावून घेताना दिसतात. हिंदू दहशतवादावरून केलेल्या वक्तव्यामुळे आता त्यांनी आपल्या पक्षालाही अडचणीत आणले आहे. एकीकडे राहुल गांधी काँग्रेसची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत असताना दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांमुळे पक्ष अडचणीत सापडताना दिसत आहे. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यामुळे पक्ष उद्धवस्त झाला असल्याची भावना भोपाळमधील काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी १०० कारणं असताना दिग्विजय सिंह यांनी असे वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणल्याचे या नेत्याने म्हटले आहे.

आजवर देशात जेवढे हिंदू दहशतवादी पकडले गेले ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते असा खळबळजनक आरोप दिग्विजय सिंह यांनी केला होता. इतकेच नाही तर नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधींची हत्या केली तोही संघाचाच होता असेही ते म्हणाले होते. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याचा भाजपाने तर समाचार घेतला होताच पण काँग्रेस पक्षातूनही दबक्या आवाजात याचा विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी मात्र दिग्विजय सिंह यांची पाठराखण केली आहे.

पुढील वर्षी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. मागील तीन टर्मपासून राज्यात भाजपाची सत्ता आहे. सध्या राज्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण असून भाजपाबद्दल अनेक ठिकाणी नाराजीचा सूर असल्याचे दिसते. या राजकीय वातावरणामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. नेमके याचवेळी दिग्विजय सिंह यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्यामुळे राज्यातले अनेक नेते हवालदिल झाले आहेत.

भाजपाचे नेते विश्वास सारंग यांनी याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. काँग्रेसने नेहमीच जातीवर आधारित शेरेबाजी केली आहे. दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य काँग्रेसच्या राजकीय खेळीचाच भाग आहे. राहुल गांधी हेच दिग्विजय सिंह यांना अशा प्रकारची वक्तव्ये करण्यास प्रवृत्त करतात, असा म्हणत राहुल यांनी स्वत: इटलीत जाऊन फुटीरतावाद्यांची भेट घेतल्याचा गंभीर आरोपही केला.

दरम्यान, दिग्विजय सिंह यांनी आपण हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला नसल्याचे स्पष्ट केले. मी नेहमी संघ दहशतवाद हा शब्द वापरला आहे. कोणतेही दहशतवादी कृत्य हे धर्माशी जोडता येत नाही. कारण कोणताही धर्म दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही, असे सप्ष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी मालेगाव, समजोता एक्स्प्रेस आणि मक्का मशीद बॉम्बस्फोट आणि संघ विचारसरणीचे कनेक्शनबाबत भाष्य केले.