Prakash Raj on CJP School campaign: कॉकरोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ग्रामीण भागात असलेल्या सरकारी शाळांमधील दुरवस्था दाखविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. स्वतः अभिजीत दिपके हे महाराष्ट्रातील गावागावांमध्ये फिरून शाळांची पाहणी करत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील शाळेत मद्यपी मुख्याध्यापक असल्याची तक्रार आल्यानंतर दिपके यांनी ग्रामस्थांसह आंदोलन केले होते. यानंतर शासनाने मद्यपी मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची कारवाई केली. यानंतर आता अभिनेते प्रकाश राज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिजीत दिपके यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील एक व्हिडीओ शेअर केला होता. सरकारी शाळेतील मद्यपी मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. निलंबित केले जात नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार देखील ग्रामस्थांनी केला. या आंदोलनात अभिजीत दिपके देखील सहभागी झाले. अखेर, ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून, मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. याची माहिती दिपके यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
अभिजीत दिपके म्हणाले, “हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा गावातील लोकांनी पहिला विजय मिळवला आहे. मद्यपी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. हा विजय मी लिंबाळा गावचे ग्रामस्थ आणि अब्दुल व त्याच्या मृत वडिलांना समर्पित करतो.” पश्चिम बंगालमधील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सीजेपीचा कार्यकर्ता अब्दुलच्या वडिलांचा खून केला होता, असा आरोप दिपकेंनी केला.
“आता थांबायचे नाही. शाळांची अवस्था चांगली होईपर्यंत लढा द्यायचा”, असा अब्दुलचा संदेशही अभिजीत दिपकेंनी सांगितला.
दिमागी बना, अंधभक्त नाही
प्रकाश राज यांनी अभिजीत दिपकेंची ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओवर त्यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदींनी उल्लेख केलेल्या ‘दिमागी नक्सल’ या संज्ञेचा आधार घेतला. प्रकाश राज यांनी लिहिले, “धन्यवाद कॉकरोचेस. व्यवस्थेकडून उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या नागरिकांचा हा विजय आहे. दिमागी बना, अंधभक्त नाही.”

८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना ‘दिमागी नक्षल’ या शब्दाचा उल्लेख केला होता. अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहायचे आहे, असा संदेश त्यांनी दिला होता. पंतप्रधान मोदींनी या शब्दाचा वापर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
सीजेपीची मोहीम काय आहे?
‘स्कूल ठिक करो’, अशी मोहीम अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुरू केली. सरकारी शाळांमधील अनास्था, सुविधांचा अभाव आणि त्याची जबाबदारी निश्चित केली जावी, यासाठी हे अभियान सुरू केल्याचे अभिजीत दिपके म्हणाले होते. सरकारी शाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधाही नाहीत, याबद्दल दिपके यांनी आवाज उचलायला सुरुवात केली होती.
