सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांबरोबर गेल्या २० दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला फक्त विद्यार्थ्यांचाच नाही, तर सेलिब्रिटींचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा देत आंदोलनस्थळी भेटी दिल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी देखील गुरुवारी आंदोलनस्थळी जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, खासदार डिंपल यादव यांनी जेव्हा आंदोलनस्थळी भेट दिली, तेव्हा व्यासपीठावरील निवेदकाने खासदार डिंपल यादव यांच्या नावाचा उल्लेख चुकीचा केला. डिंपल यादव यांचा उल्लेख करताना ‘डिंपल कपाडिया’ असं म्हटल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, ही चूक निवेदकाच्या लक्षात येताच निवेदकाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

खासदार डिंपल यादव यांनी गुरुवारी जंतर-मंतरवर जाऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी व्यासपीठावरील निवेदकाने खासदार डिंपल यादव यांच्या नावाचा उल्लेख चुकीचा केला. खासदार डिंपल यादव असं म्हणण्याऐवजी ‘खासदार डिंपल कपाडिया’ असं म्हटलं. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की आंदोलनस्थळी बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया आल्या की काय? मात्र, आंदोलनस्थळी खासदार डिंपल यादव याच आल्या होत्या. त्यामुळे ही चूक काही वेळात व्यासपीठावरील निवेदकाच्या लक्षात आली आणि निवेदकाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

निवेदकाच्या या चुकीच्या उल्लेखामुळे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हास्य कल्लोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर निवेदकाने आपल्याकडून झालेला गोंधळ लक्षात घेत लगेच माफी मागितली आणि चूक सुधारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

सोनम वांगचुक उपोषण का करत आहेत?

दिल्लीतील जंतर मंतर मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा अभिजीत दीपके यांनी ६ जून रोजी केली होती. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला वांगचुक यांनी २ जून रोजी पाठिंबा दिला होता. तसेच आंदोलकांना त्यांनी “देशभक्त” संबोधले होते. त्यानंतर वांगचुक यांनी ६ जून रोजी आंदोलनात सहभाग घेतला. २० जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. त्यावेळी सोनम वांगचुक यांनी दोन मागण्या केल्या. एक म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि दुसरी म्हणजे लडाखला राज्याचा दर्जा द्यावा व सहाव्या परिशिष्टात समावेश करावा अशा दोन मागण्या त्यांनी ठेवल्या.

या मागण्या मान्य करण्यासाठी वांगचुक यांनी केंद्र सरकारला २७ जून पर्यंतचा अवधी दिला. यातील एक जरी मागणी पूर्ण झाली तर आपण उपोषण संपवू असेही ते म्हणाले होते. परंतु केंद्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद न आल्याने वांगचुक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. त्यांच्याबरोबर AISA या संघटनेचे आणखी सहा सदस्य उपोषणाला बसले. वांगचुक म्हणाले, “मी इथे आहे कारण माझ्याकडे कोणताच पर्याय नाही. मागील ४० वर्षांपासून शिक्षण हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय राहिला. जेव्हा तरूणाई शिक्षण व्यवस्थेतील अडचणींबाबत आवाज उठवत आहे, त्यावेळी मी शांत कसा राहू शकतो?”