नवी दिल्ली : अपंग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा यासाठी केंद्र सरकारने अपंग पेन्शनच्या पात्रतेचे निकष शिथिल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेन्शनसाठी आवश्यक असलेले किमान अपंगत्वाचे प्रमाण ८० टक्क्यांवरून ४० टक्के करण्यात आले आहे. तसेच, अपंग पेन्शनसाठीची किमान वयोमर्यादा जन्मापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (एनएसएपी) २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांसाठी सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी ५३ हजार ४२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे ३.२० कोटी लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
योजनेचे नावही बदलणार
राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाचे नामकरण ‘प्रधानमंत्री सामाजिक सहायता योजना’ असे करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत विविध पेन्शन आणि सामाजिक अर्थसहाय्य योजनांची नावेही बदलण्यात येणार आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग पेन्शन योजनेची नावे अनुक्रमे ‘प्रधानमंत्री वृद्धावस्था पेंशन योजना’, ‘प्रधानमंत्री विधवा पेंशन योजना’ आणि ‘प्रधानमंत्री अपंगजन पेंशन योजना’ अशी करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे नामकरण ‘प्रधानमंत्री परिवार लाभ योजना’ असे करण्यात येणार आहे.
जन्मापासून पेन्शनच्या कक्षेत
प्रधानमंत्री अपंगजन पेंशन योजनेंतर्गत शून्य ते ७९ वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा ३७५ रुपये, तर ८० वर्षे व त्यावरील लाभार्थ्यांना दरमहा ६२५ रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. योजनेसाठी आवश्यक असलेले किमान अपंगत्व ४० टक्के निश्चित करण्यात आल्याने यापूर्वीच्या ८० टक्के निकषाच्या तुलनेत मोठ्या संख्येने अपंग व्यक्तींना योजनेच्या कक्षेत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अपंग पेन्शन योजनेतील सुधारित पात्रता निकष, लाभार्थ्यांची संख्या आणि अर्थसहाय्याच्या रकमेसंदर्भातील मार्गदर्शक सूचना पुढील तीन महिन्यांत जारी करण्यात येणार आहेत. त्यानंतर या सुधारणांची अंमलबजावणी केली जाईल. वृद्धापकाळ पेन्शन, विधवा पेन्शन आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सध्याच्या स्वरूपात सुरू राहणार आहेत.
१९९५पासून योजना
गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाची सुरुवात १५ ऑगस्ट १९९५ रोजी करण्यात आली. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि संविधानातील अनुच्छेद ४१ मधील तरतुदींनुसार केंद्र सरकारची जबाबदारी पार पाडण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाते. अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार ‘बेंचमार्क अपंगत्व’ म्हणजे किमान ४० टक्के अपंगत्व. तसेच, अन्य समान योजनांच्या तुलनेत अपंग व्यक्तींना देण्यात येणारे अर्थसहाय्य किमान २५ टक्के अधिक असावे, अशी तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळे पेन्शनसाठी अपंगत्वाची अट ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय अपंग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अधिक समावेशक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
….
