एपी, देर अल-बलाह

इस्रायल आणि हमासदरम्यानचे  युद्ध संपल्यानंतर गाझावर कोणाचे नियंत्रण असावे या मुद्दय़ावरून इस्रायलच्या नेत्यांदरम्यान असलेले मतभेद समोर आले आहेत. पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना त्यांच्या युद्ध मंत्रालयाच्या दोन सदस्यांकडून टीका सहन करावी लागत आहे. त्यामध्ये नेतान्याहू यांचे मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँट्झ यांचा समावेश आहे.

युद्धानंतर गाझामध्ये आंतरराष्ट्रीय प्रशासन असावे असा गँट्झ यांचा आग्रह आहे. ८ जूनपर्यंत तशी योजना न आखल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान नेतान्याहू आणि अन्य इस्रायली नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>“मी १२ वर्षांची असताना ज्योतिषाने पंतप्रधानपदाचं भविष्य वर्तवलं अन् बाबा संतापले”, प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता देणे आणि पॅलेस्टाईनला राष्ट्राचा दर्जा देण्याच्या दृष्टीने गाझामध्ये प्रशासनास मदत करणे अशी अमेरिकेची योजना आहे. पॅलेस्टाईनला राष्ट्राचा दर्जा देण्यास नेतान्याहू यांचा विरोध आहे. दुसरीकडे, सौदी अरेबिया आणि अन्य अरबी राष्ट्रांबरोबर संबंध सुरळीत करण्यास गँट्झ यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, अन्य कोणी आमच्यावर पॅलेस्टाईन राष्ट्र लादण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे.