नवी दिल्ली : अदानी प्रकरणावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू असलेल्या गोंधळात राहुल गांधी यांच्या बडतर्फीमुळे भर पडली. सोमवारी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळे कपडे घालून संसदेत येत दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळातच राज्यसभा आणि लोकसभेत २०२३-२४चे वित्त विधेयक मंजूर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगेंच्या दालनात सकाळी विरोधी पक्षांची बैठक झाली. यावेळी अदानी प्रकरणासह राहुल गांधींच्या बडतर्फीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची रणनीती ठरविण्यात आली. त्यानुसार काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खरगे, लोकसभेतील काँग्रेस गटनेते अधीररंजन चौधरी, मनीष तिवारी, माकपचे जॉन ब्रिटास, भाकपचे विनय विश्वम, तृणमूल काँग्रेसच्या डोला सेन, आपचे संजय सिंह, राघव चड्ढा, द्रमुकच्या कणीमोळी, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आदी खासदार काळे कपडे परिधान करून सभागृहांमध्ये आले होते. लोकसभा व राज्यसभेत विरोधी सदस्यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळय़ा जागेत येऊन निदर्शने केली.

लोकसभेत कागदांचे कपटे लोकसभाध्यक्षांच्या दिशेने भिरकाविण्यात आले. त्यामुळे ओम बिर्लानी सभागृह चार वाजेपर्यंत तहकूब केले. राज्यसभेचे कामकाजही दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.  राज्यसभेचे कामकाज दोन वाजता सुरू झाल्यानंतर लोकसभेत शुक्रवारी संमत झालेले वित्त विधेयक एका दुरुस्तीसह गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर झाले. दुरुस्तीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चार वाजता लोकसभेत मांडले. तिथेही प्रचंड गोंधळात आवाजी मतदानाने ते मंजूर करण्यात आल्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर आता २०२३-२४च्या केंद्रीय अर्थसंकल्पाची सर्व संसदीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तृणमूल खासदार काँग्रेससोबत

अदानी प्रकरणी संसदीय समितीमार्फत चौकशीला विरोध करणारा तृणमूल काँग्रेस विरोधकांच्या बैठकीपासून दूर होता. मात्र सोमवारी राहुल गांधींच्या बडतर्फीवरून पक्ष काँग्रेससोबत गेल्याचे दिसले. विरोधकांच्या बैठकीला जवाहर सरकार व प्रसून बॅनर्जी हे दोन तृणमूल खासदार उपस्थित होते. शिवाय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळय़ापासून काढलेल्या मोर्चामध्येही तृणमूलचे खासदार सहभागी झाले.

भाजप-शिंदे गटाची घोषणाबाजी

ठाकरे गटाने काँग्रेसला इशारा दिल्यानंतर, सावरकरांच्या मुद्दय़ावर भाजप आणि शिंदे गटातील खासदारांनी संसदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर निदर्शने केली. वीर सावरकरांचा अपमान देश सहन करणार नाही, अशा घोषणा या खासदारांनी दिल्या. भाजपचे प्रकाश जावडेकर, पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, शिंदे गटाचे राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, अप्पा बारणे आदी खासदारांनी राहुल गांधींचा निषेध करून माफीची मागणी केली.

काळे कपडे, कागदांची फेकाफेकी

राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाचा काँग्रेस, माकप-भाकप, तृणमूल काँग्रेस, आप आदी विरोधी पक्षांच्या खासदारांनी काळे कपडे घालून निषेध केला. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खरगे, अधीररंजन चौधरी, मनीष तिवारी, माकपचे जॉन ब्रिटास, भाकपचे विनय विश्वम, तृणमूल काँग्रेसच्या डोला सेन, आपचे संजय सिंह, राघव चड्ढा, द्रमुकच्या कणीमोळी आदी खासदार काळे कपडे परिधान करून सभागृहांमध्ये आले होते. त्यांनी लोकसभा व राज्यसभेत काँग्रेसचे सदस्य अध्यक्षांच्या समोरील मोकळय़ा जागेत येऊन निदर्शने केली. लोकसभेत कागदांचे कपडे लोकसभाध्यक्षांच्या दिशेने भिरकावल्यामुळे ओम बिर्लानी तातडीने सभागृह चार वाजेपर्यंत तहकूब केले. राज्यसभेचे कामकाजही तहकूब करावे लागले.

घाबरता का? – राहुल गांधी

अदानींची चौकशी करण्यासाठी तुम्ही एवढे का घाबरता, असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला. ‘‘एलआयसीचे भांडवल, अदानीकडे! एसबीआयचे भांडवल, अदानीकडे! ईपीएफओचे भांडवल, अदानीकडे! ‘मोदानी’चे बिंग फुटल्यावरही लोकांच्या निवृत्तिवेतनाचा पैसा अदानींच्या कंपन्यांमध्ये का गुंतविला जात आहे? पंतप्रधान, चौकशी नाही, उत्तरही नाही! एवढी भीती का?’’ असे ट्वीट गांधी यांनी केले.

गोंधळातच वित्त विधेयक मंजूर

लोकसभेत शुक्रवारी संमत झालेले वित्त विधेयक सोमवारी दुपारी विरोधकांच्या गोंधळात राज्यसभेत एका दुरुस्तीसह आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. दुरुस्तीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी हे विधेयक दुपारी चार वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा लोकसभेत मांडले. तिथेही प्रचंड गोंधळात आवाजी मतदानाने ते मंजूर करण्यात आल्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर आता २०२३-२४च्या केंद्रीय अर्थसंकल्पाची सर्व संसदीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ठाकरे गटाची मोर्चाकडे पाठ

  • खासदारकी रद्द झाल्यानंतर, राहुल गांधी यांनी, ‘माझे आडनाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी माफी मागत नाहीत’, असे विधान केले होते.
  • या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर शरसंधान साधले. यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र राजधानीत दिसले.
  • सोमवारी संसदभवन परिसरातील काँग्रेसच्या मोर्चाकडे ठाकरे गटाने पाठ फिरविली. रात्री खरगे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. ठाकरे गटाने या कार्यक्रमाला उपस्थित राहणेही टाळले.

बंगला सोडण्याचे निर्देश

  • राहुल गांधी यांना २२ एप्रिलपर्यंत सरकारी बंगला सोडण्याचे निर्देश सोमवारी देण्यात आले.
  • निवासस्थानविषयक समितीच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने ही नोटीस बजावली.
  • बडतर्फ झाल्यास एका महिन्यात सरकारी बंगला सोडावा लागतो, असा नियम असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
  • गांधी हे निवासस्थानविषयक समितीला मुदतवाढीसाठी विनंती करू शकतात, मात्र कारणांच्या आधारे निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disagreement opponents thackeray group back congress march but trinamool congress participates ysh
First published on: 28-03-2023 at 00:04 IST