नवी दिल्ली : अदानी समूहाच्या घोटाळय़ासंदर्भात विरोधी पक्षांनी संयुक्त आघाडी उभी करून केंद्र सरकारविरोधात दबाव आणखी वाढवला आहे. पण, सभागृहांमध्ये केंद्राने तहकुबीचे धोरण अवलंबल्यामुळे विरोधकांना भूमिका मांडण्याची संधी मिळालेली नाही. या कोंडीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न काँग्रेससह काही विरोधकांनी केल्यामुळे आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून चर्चा सुरू होईल.
अदानी प्रकरणावर तडजोड करण्यास व केंद्राला सहकार्य करण्यास भारत राष्ट्र समिती व आम आदमी पक्ष या दोन्ही पक्षांनी नकार दिल्याचे समजते. या दोन प्रमुख विरोधी पक्षांनी आठमुठी भूमिका घेतल्यामुळे सभागृहातील कामकाजावरून विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, या पक्षांना समजावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. काही विरोधी पक्षनेत्यांनी सोमवारी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर, काँग्रेस चर्चेला तयार असल्याचे सोनिया गांधींनी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांकडे स्पष्ट केले.
अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ संस्थेने अदानी समूहाच्या आर्थिक गैरव्यवहारांवर प्रसिद्ध केलेला अहवाल अत्यंत गंभीर असून त्यावर संसदेमध्ये चर्चा झालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका काँग्रेससह विरोधकांनी घेतली होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसदेतील दालनामध्ये सोमवारीही विरोधकांच्या नेत्यांची बैठक झाली. संसदेची दोन्ही सभागृहे सातत्याने तहकूब होत राहिली तर, केंद्र सरकारला चर्चा न करण्याची पळवाट सापडेल आणि चर्चा न झाल्याचे खापर विरोधकांवर फोडले जाईल. त्यापेक्षा केंद्र सरकारला सहकार्य करून अदानी समूहाच्या मुद्दय़ावर चर्चा घडवून आणावी, अशी व्यूहरचना विरोधकांकडून आखली जात आहे. मात्र, भारत राष्ट्र समिती आणि आम आदमी पक्ष ही तडजोड करण्यास अजिबात तयार नाही. या संदर्भात अंतिम निर्णय मंगळवारी सकाळी खरगेंच्या दालनामध्ये होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
अदानी प्रकरणावरून १६हून अधिक विरोधी पक्ष नेत्यांनी दोन्ही सभागृहांमध्ये स्थगन प्रस्ताव व नियम २६७ अंतर्गत नोटिसा दिल्या आहेत. मात्र, त्या स्वीकारल्या जात नसून सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात आहे. सातत्याने तहकुबी झाली तर विरोधकांचे म्हणणे ऐकले जाणार नाही, लोकांना आमची भूमिकाही समजणार नाही. त्यापेक्षा कुठल्याही निमित्ताने सभागृहांमध्ये चर्चा होणार असेल तर ठणकावून मते मांडता येतील, असा दावा या नेत्याने केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर परंपरेप्रमाणे चर्चा करावी, अशी विनंती केंद्र सरकारने विरोधकांना केली आहे. त्यावर, विरोधी पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दिवसभरासाठी कामकाज तहकूब
- अदानीच्या मुद्दय़ावर विरोधकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारीही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
- लोकसभेमध्ये सभागृह सुरू होताच विरोधी सदस्य आसनांसमोरील मोकळय़ा जागेत उतरले आणि ‘अदानी सरकार शेम-शेम’ अशा घोषणा देऊ लागले.
- गोंधळामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केले. त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
- राज्यसभेचे कामकाजही आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.