रशियाकडून सवलतीच्या दरामध्ये कच्चं तेल विकत घेतल्याने भारताला जवळजवळ ३५ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. फेब्रवारी महिन्यामध्ये युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या युद्धानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी आर्थिक निर्बंध घातले. त्यामुळेच आपला व्यापार सुरु रहावा म्हणून रशियाने भारताला स्वस्त दरामध्ये कच्चं तेल विकण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टांचा फायदा भारताला झाल्याची माहिती या विषयातील तज्ज्ञांनी दिल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

नक्की पाहा >> एक लाख गुंतवा पाच वर्षांत १३ लाख मिळवा! गुंतवणुकीचा उत्तम, सुरक्षित पर्याय ठरु शकते ‘ही’ सरकारी योजना; जाणून घ्या तपशील

याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रशियन फौजांनी युक्रेनवर आक्रमण केलं. त्यावेळी जगभरामध्ये तणावपूर्ण राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळेच रशियाकडे अनेक वर्षांपासून तेल विकत घेणाऱ्या काही देशांनी निर्बंध लादत रशियाकडून तेल घेणं बंद केलं. या निर्बंधांमुळे रशियाला कच्च्या तेलाचे लाखो पिंप निर्यातीसाठी तयार असूनही देशाबाहेर पाठवता आले नाही. त्यामुळेच रशियाने कच्च्या तेलाच्या जागतील दरांपेक्षा बऱ्याच कमी दराने इतर देशांना तेल विक्री करणं सुरु केलं. त्यावेळी भारताने अमेरिकेसहीत इतर अनेक देशांकडून दबाव टाकला जात असतानाही रशियाकडून तेल विकत घेण्याचा निर्णय घेतला. सवलतीमध्ये रशियाकडून मिळणारं तेल भारतामध्ये आयात करण्यात आलं.

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये चीननंतर दुसरा सर्वात मोठा देश म्हणून भारताचं नाव घेतलं जाऊ लगालं. त्यावेळी भारतामधील एकूण तेल आयातीपैकी १२ टक्के तेल हे रशियाकडून आयात केलं जात होतं. पूर्वी हीच आकडेवारी एका टक्क्यांहूनही कमी होती. याच वर्षी जुलै महिन्यामध्ये रशिया भारताला तेल पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश ठरला. सौदी अरेबिया सध्या भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ऑगस्ट महिन्यात भारताला तेल पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये रियाद दुसऱ्या स्थानी असून रशिया तिसऱ्या स्थानी आहे. रॉयटर्सने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.

नक्की वाचा >> ५२ हजार कोटींना Ambuja, ACC संपादित केल्यावर अदानींनी सांगितलं सिमेंट क्षेत्रात उतरण्याचं कारणं; म्हणाले, “सरकारी स्तरावर अनेक…”

भारताच्या वाणिज्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जुलैदरम्यान भारतामध्ये रशियातून होणाऱ्या तेलाची आयात आठ पटींने वाढली. ही आयात ११.२ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहचली. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ही आयात अवघी १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती. मार्च महिन्यापासून भारत रशियाकडून सवलतीच्या दरातील तेल विकत घेऊ लगाला. आयात करण्यात आलेल्या तेलाची किंमत ही १२ अब्ज अमेरिकी डॉलर्सहून अधिक आहे. मागील वर्षी एकूण १.५ अब्ज डॉलर्स किंमतीचे तेल आयात करण्यात आलं होतं. सध्या आयात करण्यात आलेल्या १२ अब्ज डॉलर्सच्या कच्च्या तेलापैकी सात अब्ज डॉलर्सचं तेल केवळ जून आणि जुलै महिन्यात आयात करण्यात आलं आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मागील आठवड्यामध्येच पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) २२ वी वार्षिक परिषदेत दोन्ही नेते एकमेकांना भेटले होते. ‘‘ही युद्धाची वेळ नव्हे,’’ असा सल्ला शुक्रवारी झालेल्या या भेटीत मोदींनी पुतीन यांना दिला. सध्या जगासमोर अन्नधान्य, खते आणि इंधन टंचाई सारख्या सर्वात मोठ्या समस्या आहेत, असेही मोदींनी पुतीन यांच्या निदर्शनास आणून दिले.