जातीय विषमता आणि लिंगभेद हे सामाजिक प्रश्न भारतीय वातावरणाचा अविभाज्य भाग आहेत. इथल्या हवेतच तुम्हाला त्यांचे अस्तित्व जाणवेल. ज्याप्रमाणे अंतराळात जाईपर्यंत गुरूत्वाकर्षण अस्तित्वात असते त्याचप्रमाणे भारतात जाल तिथे तुम्हाला विषमता पहायला मिळेल, असे परखड मत दिग्दर्शक नागराज मंजुळे याने व्यक्त केले. तुम्ही नदीत दगड फेकेपर्यंत पाण्याखाली किती चिखल आहे, हे तुम्हाला समजत नाही. भारतामधील जातीय व्यवस्थाही तशीच आहे. परंतु, सध्या समाज माध्यमांमुळे आपण लोकांची मते आणि प्रतिक्रिया याबद्दल अधिक सजग झाल्याचे त्याने सांगितले. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो बोलत होता. यावेळी नागराजने हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येसंदर्भातही भाष्य केले. समाज माध्यमांवर सध्या या मुद्द्यावरून तावातावाने चर्चा केली जात आहे. लोकांचा संयम लवकर सुटत असून ते एकमेकांविषयी अपमानास्पद बोलत आहेत. सध्याच्या काळात कोणीही समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्यायलाच तयार नाही, ही गोष्ट मला निराशादायी वाटते, असे नागराजने सांगितले. लोक त्यांच्या मताबद्दल दुराग्रही झाले आहेत. माझ्या मते त्यांच्यात संवाद झाला पाहिजे. आपण एकाच देशात राहतो आणि आपल्यापैकी कोणीही देशद्रोही नाही. जर आपल्या सर्वांचेच देशहिताला प्राधान्य असेल तर काय चुकते आहे, याचा आपण विचार केला पाहिजे.