scorecardresearch

चिनी घुसखोरीवर चर्चा करा!; विरोधकांनी केंद्राला पुन्हा घेरले; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे अखेरचे तीन दिवस उरले असून बुधवारीही विरोधकांनी चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

चिनी घुसखोरीवर चर्चा करा!; विरोधकांनी केंद्राला पुन्हा घेरले; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे अखेरचे तीन दिवस उरले असून बुधवारीही विरोधकांनी चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सकाळच्या सत्रात लोकसभेचे कामकाज तहकूब झाले.

‘चीनच्या मुद्दय़ावर आम्हाला फक्त चर्चा करायची आहे. केंद्राकडून आम्ही लष्कराची गुपिते मागत नाही’, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुन्हा केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘चीन सातत्याने घुसखोरी करण्याचे धाडस का करत आहे? चीनच्या घुसखोरीवर आपण प्रत्युत्तर देत आहोत. पण घुसखोरी होऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रतिबंधात्मक कोणते उपाय करत आहे? चीनला रोखण्यासाठी आपण कोणती तयारी केलेली आहे? चिनी लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चेच्या १६ फेऱ्या झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियात बालीमध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्या भेटीत जर काही सांगितले असेल तर, त्यांच्यामध्ये काय बोलणे झाले, हे जाणून घेण्याचा देशाला अधिकार आहे’, असे चिदंबरम म्हणाले. चिदंबरम यांनी हाच मुद्दा राज्यसभेत पुरवणी मागण्यांसंदर्भातील विनिमय विधेयकावरील चर्चेमध्ये देखील उपस्थित केला होता. त्यावर भाजपने आक्षेप घेतला होता.

राज्यसभेमध्ये सभापती जगदीप धनखड यांनी चिनी घुसखोरीवर चर्चा करण्यासंदर्भातील नोटीस फेटाळली. केंद्राने सविस्तर निवेदन दिले असल्याने चर्चेची गरज नसल्याचे धनखड म्हणाले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधक चीनच्या मुद्दय़ावरून सभागृहात आक्रमक झाल्याने कामकाज तहकूब झाले. ‘चिनी घुसखोरीबाबत सभागृहात सविस्तर माहिती दिली गेली तर देशालाही वास्तव समजेल. या विषयावर चर्चा झाली आणि केंद्र सरकारकडून एकतर्फी भूमिका मांडली गेली तर लोकांना वास्तव समजणार तरी कसे, असा प्रश्न काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीतही सोनिया गांधींनी चिनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे काँग्रेसचे सदस्य बुधवारी अधिक आक्रमक झाले होते.

तृणमूल गैरहजर

अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या आवारातील गांधी पुतळय़ासमोर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी निदर्शने केली. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-उद्धव ठाकरे गट, आम आदमी पक्ष, द्रमुक, दोन्ही डावे पक्ष आदी पक्षांचे सदस्य निदर्शने करत होते. मात्र, तृणमूल काँग्रेसचे खासदार सहभागी झाले नाहीत. निदर्शनासाठी निमंत्रण दिले गेले नसल्याचा दावा तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या