नेपाळच्या महाप्रलयात आत्तापर्यंत ५८७ लोकांचा बळी गेला आहे. तर १५०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. तसंच सुमारे २९० भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे. तसंच मदत आणि बचावकार्यही सुरु आहे. या महापुरामुळे अनेक गावं भुईसपाट झाले आहेत. नेपाळमधील या महापुराच्या घटनेनंतर संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान नेपाळमधल्या ग्रीन हाऊसची चर्चाही चांगलीच होते आहे. तसंच व्हिडीओही व्हायरल होत आहेत.

ग्रीन हाऊस महापुरात वाहून गेलं नाही व्हिडीओ व्हायरल

नेपाळमध्ये जो महाप्रलय आला आहे त्यात इमारतीच्या इमारती वाहून गेल्या आणि अत्यंत भयंकर व्हिडीओ समोर येत आहेत यातच नेपाळच्या ग्रीन हाऊसचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. नेपाळच्या महाप्रलयात ग्रीन हाऊस वाहून गेलं नाही. सुरक्षित राहिलं. या घराच्या टेरेसवर कुटुंब गेल होतं ते सगळेजण वाचले आहेत तसंच या महाप्रलयात हे घरही वाचलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या ग्रीन हाऊसचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक लोक या ग्रीन हाऊसचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. ग्रीन हाऊस आणि त्यात असलेलं कुटुंब वाचलं आहे. या घराचं इंजिनिअरींग ज्या इंजिनिअरने केलं त्याला कडक सॅल्युट असं एका युजरने म्हटलं आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसतं आहे?

ग्रीन हाऊसचे दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पहिल्या व्हिडीओत पाण्याच्या प्रचंड लाटा येताना दिसत आहेत. मात्र हे घर आणि त्या घराच्या गच्चीवर असलेले लोक सुरक्षित राहिले आहेत हे दिसतं आहे. हे लोक पाणी आणि त्याचा ओढा आणि तसंच हा महाप्रलय पाहून घाबरुन गेले आहेत. आपण वाचू का? अशी भीती त्यांना वाटते आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत पुराचं पाणी वाहून गेलं आहे. चिखल आणि गाळ आजूबाजूला दिसतो आहे पण ग्रीन हाऊस सुरक्षित राहिलं आहे. तसंच या घरातले सगळे लोक वाचले आहेत हे दुसऱ्या व्हिडीओतही दिसतं आहे. त्यामुळे या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय माहिती दिली आहे?

नेपाळमधील या विनाशकारी पुरामुळे शेकडो भारतीय देखील बेपत्ता आहेत, तर अनेकजण अद्यापही अडकलेले आहेत. सध्या नेपाळच्या सैन्यांकडून, पोलिसांकडून आणि बचाव यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. नेपाळमधील या पुरामध्ये नेमकं किती भारतीय नागरिक अडकले आहेत आणि किती भारतीय नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत? याची माहिती शुक्रवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. ३२० भारतीय अद्यापही बेपत्ता आहेत, तर ४०० जण सुरक्षित असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी दिली आहे. या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. तसेच पुराचा फटका बसलेल्या इतर शेकडो लोकांशी संपर्क साधण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे.