काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, ‘या’ महिन्यात निवडणूक होणार

वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याचा मुद्दा उपस्थित करत यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचा आरोप केला. हा मुद्दा काँग्रेसच्या आजच्या (१६ ऑक्टोबर) कार्यकारणीच्या बैठकीतही उपस्थित झाला.

दिल्लीत काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदांवर जोरदार खलबतं सुरू आहेत. अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्याचा मुद्दा उपस्थित करत यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याचा आरोप केला. हा मुद्दा काँग्रेसच्या आजच्या (१६ ऑक्टोबर) कार्यकारणीच्या बैठकीतही उपस्थित झाला. यानंतर पक्षाने आता पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणुका घेण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

अध्यक्षपदाची निवडणूक आणि सदस्यता अभियानाची अधिकृत घोषणा बाकी असली तरी ती केवळ औपचारिकता असल्याचंही सांगितलं जातंय. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी यांनीच आतापर्यंत अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. देशातील काही राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदी राहणार आहेत. या निवडणुकांनंतरच काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल.

आगामी विधानसभा निवडणुकांनंतरच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक

कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक कधी घ्यायची यावर चर्चा झाली. मात्र, बहुसंख्य लोकांनी लगेच ही निवडणूक घेण्याला विरोध केला. सध्या पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीकडे लक्ष द्यावं, असंच त्यांचं म्हणणं होतं. आत्ताच पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेतल्यास निवडणुकांच्या तयारीवर याचा परिणाम होईल, असंही मत व्यक्त करण्यात आलं.

कार्यकारणीतील बहुतांश सदस्यांनी नव्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक होण्याआधी सदस्यता अभियान आणि स्थानिक पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंतच्या निवडणुका घेण्याचं मत व्यक्त केलं. मात्र, या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत न घेण्याचंही मत व्यक्त करण्यात आलं.

हेही वाचा : दिल्लीत काँग्रेसच्या कार्य समितीच्या बैठकीला सुरुवात, काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष

“मीच काँग्रेसची अध्यक्षा आहे”

दरम्यान, विविध राज्यांमधील काँग्रेसमधील गोंधळादरम्यान शनिवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली. पूर्णवेळ अध्यक्षपदाची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे नाव न घेता, सोनिया गांधी यांनी त्या काँग्रेसची स्थायी अध्यक्ष असल्याचे म्हणत विरोधकांना उत्तर दिले आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, “मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे, माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी प्रामाणिक चर्चा करूया. आम्ही ३० जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता, पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली. आज स्पष्टता आणण्याची संधी आहे.”

“आम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, पण जर आपण एकजूट आणि शिस्तबद्ध राहिलो आणि केवळ पक्षाच्या हितावर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की आम्ही चांगले काम करू,” असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Discussion on congress president election to be held in september next year according to sources pbs

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या