श्रीनगर : पाकिस्तानसोबत चर्चा करावी अशी सूचना केल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी टीका केली. त्याऐवजी, काश्मीरला देशातील सर्वात विकसित राज्य बनवण्यासाठी सरकार जम्मू- काश्मीरच्या युवकांशी चर्चा करेल, असे ते म्हणाले.

ऑगस्ट २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर प्रथमच जम्मू- काश्मीरच्या भेटीवर आलेल्या शहा यांनी अनेक विकास प्रकल्पांचे दूर- उद्घाटन केले आणि त्यापैकी काहींची कोनशिला बसवली.

‘सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी अशी सूचना फारुक अब्दुल्ला यांनी केल्याचे मी वृत्तपत्रांत वाचले. त्यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, मात्र त्याऐवजी आपण काश्मिरी युवकांशी बोलायला हवे’, असे येथील शेर-ई-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (एसकेआयसीसी) आयोजित कार्यक्रमात बोलताना शहा यांनी सांगितले. ‘अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा एकमेव उद्देश काश्मीर, जम्मू व नवनिर्मित लडाख यांना विकासाच्या मार्गावर आणण्याचा आहे. आमच्या प्रयत्नांची फळे तुम्हाला २०२४ पर्यंत दिसून येतील’, असेही गृहमंत्री म्हणाले.