बनारसमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा वाद ताजा असताना आता कर्नाटकातील मांड्या येथे बांधलेल्या जामा मशिदीवरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. टिपू सुलतानने हनुमानाचं मंदिर पाडून त्याठिकाणी ही मशीद बांधली असल्याचा दावा एका हिंदुत्ववादी गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ही मशीद पुन्हा हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी संबंधित गटाकडून करण्यात आली आहे.

याबाबत नरेंद्र मोदी विचार मंचच्या सदस्यांनी मांड्याच्या जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन दिलं आहे. हनुमान मंदिर पाडून बांधलेली मशीद हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी या मंचाकडून करण्यात आली आहे. जामा मशीद म्हणून ओळखली जाणारी ही मशीद २३६ वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. श्रीरंगपट्टन येथे बांधलेली ही मशीद आता नव्या वादाचं कारण बनू शकते. नरेंद्र मोदी विचार मंचाचे सचिव सीटी मंजूनाथ म्हणाले की, “पर्शियाच्या शासकाला लिहिलेल्या पत्रात टिपूने हनुमान मंदिर पाडून ही मशीद बांधल्याचा उल्लेख केला आहे. तसेच मशिदीच्या स्तंभांवर हिंदू श्लोक देखील लिहिले आहेत, असा दावा मंजूनाथ यांनी केला आहे.

त्यांनी पुढे आपल्या दाव्यात म्हटलं की, १७८२ मध्ये हनुमान मंदिर पाडल्यानंतर टिपू सुलतानने ही मशीद बांधली होती. ही मशीद एकेकाळी हिंदूंचं मंदिर होतं, हे सिद्ध करणारे भक्कम पुरावे आहेत. मशिदीच्या आतमध्ये तत्कालीन होयसला साम्राज्याची चिन्हं आहेत. त्यामुळे संबंधित मशिदीत हिंदूंना पूजा करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मंजूनाथ यांनी केली. तर मुघल राजवटीच्या काळात येथील ३ हजार ६०० मंदिरं पाडण्यात आली, असा दावा कर्नाटकचे माजी मंत्री के ईश्वरप्पा यांनी केला आहे.

खरंतर, श्रीरंगपट्टन येथे जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचं वर्चस्व आहे. श्रीरंगपटन हा वोक्कालिगा समाजाचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. कर्नाटकात पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काही लोक या ताज्या वादाचा संबंध पक्षाच्या निवडणूक प्रचाराशी जोडताना दिसत आहेत.