केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. माकपने घेतलेली भाजपविरोधी भूमिका हा संधीसाधूपणा असल्याची टीका केरळचे मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी केली आहे. तर काँग्रेसने नेहमीच भाजपबद्दल सौम्य भूमिका घेतल्याचा आरोप पी. विजयन यांनी केला आहे.
माकपने भाजपच्या बाबतीत कालपरत्वे आपली धोरणे आणि भूमिका यामध्ये बदल केला आहे, असा आरोप चंडी यांनी वायनाड येथे वार्ताहरांशी बोलताना केला. काँग्रेसने जातीयवादी शक्तींबाबत आपली भूमिका कधीही सौम्य केली नाही, अशा शक्तींचा नेहमी विरोध केला, असे चंडी म्हणाले. आणीबाणीच्या काळात संघ परिवारासोबत हातमिळवणी केल्याबद्दल चंडी यांनी माकपवर टीका केली. काँग्रेसशी १९७७ मध्ये लढताना माकपने जनसंघाशी हातमिळवणी केली, तेव्ही तुम्ही कोठे होता, असा सवाल चंडी यांनी विजयन यांना केला आहे. तथापि, काँग्रेस सरकारने आणीबाणी जाहीर केल्याने देशात लोकशाही पुनस्र्थापित करण्यासाठी १९७७ मध्ये माकपला भूमिका घ्यावी लागली होती, असा बचाव विजयन यांनी केला आहे. आणीबाणीने देशात जनसंघाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळे चंडी यांनी आणीबाणीची चूक समजून घ्यावी, असे विजयन म्हणाले.