Donald Trump Video In White House: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दैवी ज्ञान आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी देशभरातील धर्मगुरूंनी (पाद्री) प्रार्थना केली. ट्रम्प यांनी यासाठी अमेरिकेच्या विविध भागातील धर्मगुरूंना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी धर्मगुरूंनी ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्रम्पना स्पर्श करत धर्मगुरू प्रार्थना करताना व्हिडिओत दिसत आहेत.

ट्रम्प आणि सैन्यासाठी प्रार्थना

आव्हानात्मक काळात डोनाल्ड ट्रम्प यांना दैवी मार्गदर्शन आणि ज्ञान मिळावे तसेच, अमेरिकन सशस्त्र दलाच्या सुरक्षेसाठी धर्मगुरूंनी प्रार्थना केली. व्हाईट हाऊसमधून समोर आलेल्या व्हिडिओत धर्मगुरूंचा एक समूह राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना घेरून उभा आहे. सर्वाजण ट्रम्प यांच्यावर हात ठेवून प्रार्थना करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करताना त्यांच्या नेतृत्व आणि दैवी ज्ञान मिळावे यासाठी धर्मगुरूंनी प्रार्थना केली. 

पाद्रींनी काय प्रार्थना केली?

“स्वर्गातून त्यांना ज्ञान मिळावे यासाठी आम्ही प्रार्थना करतोय, त्यांचे हृदय, मनासाठी. या आव्हानात्मक काळात त्यांना मार्गदर्शन कराल. तुमचा आशिर्वाद आणि संरक्षण त्यांना मिळेल, यासाठी प्रार्थना करतो”, असे प्रमुख धर्मगुरू टॉम मुलिन्स प्रार्थना करताना दिसत आहेत.

संरक्षण दलात काम करणाऱ्या पुरुष, महिलांना सुरक्षित ठेवाल यासाठी प्रार्थना करतो. महान राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना तुम्ही ताकद द्याल अशी प्रार्थना करतो, असे धर्मगुरू प्रार्थना करताना दिसत आहेत.

अमेरिका – इस्त्रायल विरुद्ध इराण संघर्ष तीव्र

अमेरिका – इस्त्रायलने इराण विरुद्धचा संघर्ष तीव्र केला आहे. अमेरिकेने इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत इराणच्या विविध भागात हल्ले सुरुच आहेत. इस्त्रायकडून देखील क्षेपणास्त्रांचा मारा सुरुच आहे. दोघांच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तसेच, इराणमधील अनेक महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणने प्रत्युत्तरदाखल आखातील देशातील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केले आहे.