Divorce Perfume By Dubai Princess : संयुक्त अरब आमिरातचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान तसंच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची कन्या आणि दुबईची राजकुमारी शेख महरा मोहम्मद रशीद अल मकतूमने जुलै महिन्यात इन्स्टाग्राम पोस्ट करत पतीला सार्वजनिकरित्या घटस्फोट दिला होता. तलाक तलाक तलाक म्हणत तिने पतीबरोबरचे संबंध तोडले होते. आता तिने एक नवा परफ्युम लॉन्च केलाय. DIVORCE असं या परफ्युमचं नाव आहे.

इन्स्टाग्राम पोस्टवरूनच शेख मेहरा यांनी Mahra M1 मधील DIVORCE परफ्युमचा टीझर सादर केला. सोशल मीडियावर या परफ्युमची चर्चा आहे.

१९९४ मध्ये जन्मलेल्या शेख महारा यांनी गेल्यावर्षी २७ मे रोजी शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर पाच महिन्यांनी त्यांनी गुड न्यूज दिली. सोनोग्राफीचा फोटो स्टोरीवर शेअर करत त्यांनी ही बातमी दिली होती. पण मुलीचा जन्म होताच दोन महिन्यांनी शेख महरा यांनी घटस्फोट जाहीर केला होता.

हेही वाचा >> “प्रिय पती, तुम्ही इतर ठिकाणी व्यग्र असल्याने…”, UAE च्या पंतप्रधानांची लेक शेख महरा यांनी इन्स्टाग्रामवरून पतीला दिला घटस्फोट!

कोण आहे शेख महरा?

शेख महराचा जन्म २६ फेब्रुवारी १९९४ मध्ये युएईतल्या दुबईत झाला. शेख महरा २९ वर्षांची आहे. ती अमीराती आणि ग्रीस अशा दोन्ही देशांशी संबंध असणारी मुलगी आहे कारण तिची आई जो ग्रिगोराकोस ग्रीसची आहे.

शेख महराने तिचं प्राथमिक शिक्षण दुबईतल्या एका खासगी शाळेत घेतलं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तिने ब्रिटनमधल्या एका विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशन या विषयात पदवी घेतली आहे. तसंच मोहम्मद बिन राशिद यांच्या महाविद्यालयातूनही एक पदवी घेतली आहे. शेख महरा तिच्या सामाजिक कार्यांसाठी ओळखली जाते. महिला सशक्तीकरण आणि स्थानिक नक्षीकाम करणाऱ्यांना ती पाठिंबा देते. याशिवाय ती घोडेस्वारीसाठीही प्रसिद्ध आहे.

शेख महराचं लग्न २०२३ मध्ये

शेख महराचं लग्न २०२३ मध्ये बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी झालं. मे महिन्यात शेख महरा बिंतला एक मुलगी झाली. तिचं नाव शेख महराने माना बिन मोहम्मद अल मकतूम असं ठेवलं आहे. या गोड बातमीला अवघे दोन महिने पूर्ण झाले आहेत. अशातच शेख महराने घटस्फोट घेतल्याचं इन्स्टाग्रामवर जाहीर केलं आहे. शेख महराने हा आरोप केला आहे की तिचे पती दुसऱ्या महिलेच्या प्रेमात आहेत, त्या दोघांचं अफेअर सुरु आहे त्यामुळे मी त्याच्यापासून विभक्त होते आहे. विशेष बाब म्हणजे घटस्फोटाची ही घोषणा शेख महराने केल्यानंतर तिने आणि तिच्या पतीने दोघांनीही इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. शेख महराने ज्या प्रकारे तिचा घटस्फोट जाहीर केला ते एक धाडसी पाऊल मानलं जातं आहे.