Divya Mittal Political Entry details : नागरी सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणाऱ्या दिव्या मित्तल १५ ऑक्टोबर रोजी आपली पुढील रणनीती जाहीर करणार आहेत. उत्तर प्रदेशला आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात मानून, मित्तल यांनी नवरात्रीच्या काळात मिर्झापूरमध्ये लोकांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. त्यामुळे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या योजनांबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

राजकीय प्रवासातील प्रत्येक पाऊल जाहीरपणे लोकांसमोर मांडणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ज्यावेळी मिर्झापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत, त्याच सुमारास मित्तल यांचीही ही घोषणा होण्याची शक्यता आहे. या योगायोगामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे, तरीही मित्तल यांनी ही घोषणा मुख्यमंत्री किंवा भाजपाला आव्हान देण्यासाठी असल्याचा कोणताही संकेत दिलेला नाही. मित्तल यांनी म्हटलं आहे की, त्या आपल्या राजकीय प्रवासातील प्रत्येक पाऊल जाहीरपणे लोकांसमोर मांडतील आणि त्यांनी लोकांना त्यांच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या राजकीय योजनांच्या स्वरूपाबाबत तर्कवितर्क लावले जात असताना, त्यांनी कोणत्याही विद्यमान राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा आपला हेतू नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.

जनसंपर्क वाढवण्यावर भर

मिर्झापूरच्या जिल्हा दंडाधिकारी (डीएम) म्हणून काम केलेल्या दिव्या मित्तल यांनी नवरात्रीदरम्यान दौरे सुरू केले असून स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला आणि स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या अलीकडील सार्वजनिक उपस्थितीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं असून, समर्थकांनी फुलांचे हार घालून आणि “दिव्या दीदी जिंदाबाद” अशा घोषणा देऊन त्यांचे स्वागत केलं आहे. या भव्य स्वागतामुळे १३ वर्षांच्या सरकारी नोकरीच्या कारकिर्दीनंतर मित्तल या एक राजकीय नेत्या म्हणून उदयास येत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे त्या मिर्झापूरला आपल्या राजकीय उपक्रमांचे केंद्र बनवणार का, या चर्चेलाही गती मिळाली आहे. मात्र, १५ ऑक्टोबरच्या घोषणेचं नेमकं स्वरूप काय असेल, हे मित्तल यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तसेच, २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस आहे की नाही किंवा त्या कोणत्या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरू शकतात, यालाही त्यांनी दुजोरा दिलेला नाही.

समाजवादी आणि काँग्रेसकडून संकेत

मित्तल यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशामुळे उत्तर प्रदेशातील अनेक राजकीय पक्षांनी उत्सुकता दाखवली आहे. समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांना यापूर्वी त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या योजनांबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं होतं की, त्यांना “हिरवा आणि लाल स्कार्फ” घालायचा की इतर काही, हे त्यांनी स्वतः ठरवायचं आहे. हा टोला राजकीय वर्तुळात त्यांना पक्षात सामील करून घेण्याच्या इच्छेचा संकेत मानला गेला आहे. मात्र, त्यांना तिकीट किंवा मतदारसंघाची कोणतीही अधिकृत ऑफर देण्यात आलेली नाही. उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनीही म्हटलं होतं की, जर मित्तल यांना निवडणूक लढवायची असेल आणि समाजासाठी काम करायचं असेल, तर काँग्रेस त्यांच्या नावाचा विचार करेल.

“काँग्रेसने नेहमीच महिलांना प्रोत्साहन दिलं आहे आणि ज्यांना लोकांसाठी काम करण्याची इच्छा आहे, त्यांचं स्वागत आहे”, असं राय म्हणाले होते. मित्तल यांनी आयएएस पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांना जाहीर पाठिंबाही दिला होता. जनसत्ता दल (लोकतांत्रिक) या पक्षासह इतर पक्षांनीही त्यांच्या राजकीय प्रवेशाचं स्वागत केले आहे आणि त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा व पक्षाच्या तळागाळातील उपस्थितीचा मेळ घालून उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.