दिव्या मित्तल उत्तर प्रदेशात जिल्हाधिकारी होत्या. तसेच भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांनी तब्बल १३ वर्षे काम केलेले आहे. मात्र, ३० ऑगस्ट रोजी अचानक दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे दिव्या मित्तल या देशभरात चर्चेत आल्या आहेत. १३ वर्षे प्रशासकीय सेवेत काम केल्यानंतर अचानक मित्तल यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यामागचे कारण काय आहे? आता त्या पुढे काय करणार आहेत, याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. IIT आणि IIM मधून शिक्षण घेतल्यानंतर लंडनमधील उच्च पदस्थ नोकरी सोडून त्या UPSC उत्तीर्ण झाल्या होत्या. १३ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी पोस्ट लिहीत राजीनामा जाहीर केला होता.
माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल आता आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहेत. ३० ऑगस्ट रोजी दिलेला त्यांचा राजीनामा सरकारने १४ सप्टेंबर रोजी स्वीकारला. आपल्या कामातून ओळख निर्माण करणाऱ्या दिव्या मित्तल आता पुढे काय करणार? त्यांच्या लाखो फॉलोअर्सना या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे. त्या एक उत्तम अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. “आपण आता या प्रवासातून पुढे जायला तयार आहोत,” असे दिव्या मित्तल यांनी म्हटले आहे.
“लोकांना काहीतरी द्यायला आले होते, पण…”
राजीनाम्याबद्दलच्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये स्वतःच्या भावना व्यक्त करताना दिव्या मित्तल यांनी लिहिलं होतं की, “मी किती मूर्ख होते, जे विचार करायचे की मी या देशाला किंवा लोकांना काहीतरी द्यायला आले आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, या १३ वर्षांत मलाच लोकांकडून सर्वाधिक प्रेम, सन्मान आणि आपुलकी मिळाली. लोकांचे हे ऋण माझ्यावर आयुष्यभर राहील.”
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिव्या मित्तल यांनी X वर पुढील पोस्ट केली आहे… त्यात मित्तल यांनी लिहिले आहे की,
भविष्यातील पावलांबद्दल सोशल मीडियावर अनेक तर्क लावले जात आहेत, त्यात…
कुटुंब की करिअर?: “मुले अजून लहान आहेत, त्यामुळे आता घरच सांभाळावे,” असा एक सूर उमटत आहे.
परदेशातील संधी: “उत्तम पगाराचे पॅकेज मिळेल, त्यामुळे पुन्हा परदेशात निघून जावे,” असा सल्ला काही जण देत आहेत.
स्पर्धा परीक्षा व कोचिंग: “आयएएस (IAS) परीक्षेवर पुस्तक लिहिले आहे, त्यामुळे कोचिंग क्षेत्रात प्रवेश करावा,” अशीही चर्चा आहे.
राजकीय प्रवेश: “राजकारणातील उमेदवारी नक्की झाली असणार, त्यामुळे राजकीय प्रवास सुरू होईल,” अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
२९ सप्टेंबरला सकाळी ८:३० वाजता मी भविष्यात नेमकं काय करणार आहे, ते सांगणार आहे. असंही त्यांनी पोस्टच्या शेवटी लिहीलं आहे.
