उत्तर प्रदेशातील बहुचर्चित आणि धडाडीच्या माजी आयएएस (IAS) अधिकारी दिव्या मित्तल यांनी प्रशासकीय सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर अखेर त्यांच्या पुढच्या वाटचालीवर शिक्कामोर्तब केले आहे. “मी राजकारणात प्रवेश करत आहे,” अशी घोषणा दिव्या मित्तल यांनी एका ९ मिनिटांच्या व्हिडिओ संदेशाद्वारे केली. गेल्या काही दिवसांपासून दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्यामुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. या सर्व प्रश्नांना पूर्णविराम देत त्यांनी आपल्या राजकीय प्रवेशामागची भूमिका मांडली.

‘मला लोकांचा आवाज बनायचे आहे’

आपल्या व्हिडिओ संदेशात बोलताना दिव्या मित्तल म्हणाल्या, “राजीनामा दिल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. मी आज त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला आले आहे. मला लोकांनी विचारले की, सनदी अधिकारी बनून सर्व काही तर मिळवले, आता पुढे काय? मला अशा लोकांचा आवाज बनायचे आहे, ज्यांचा आवाज सरकारी कार्यालयांपर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचला तरी ऐकला जात नाही. मला देशाच्या स्वातंत्र्याच्या ८० वर्षांचा हिशोब हवा आहे.”

आपल्या प्रशासकीय सेवेतील अनुभव सांगताना त्यांनी यंत्रणेतील त्रुटींवर बोट ठेवले. एका गावातील प्राथमिक शाळेच्या मंजुरीचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या, “नियम होते, मंजुरी होती आणि पैसाही होता; पण फक्त अधिकाऱ्यांची आणि राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नव्हती. इच्छाशक्ती असती तर डोंगरानेही रस्ता दिला असता, पण नियत नसेल तर एक फाईलच डोंगर बनून उभी राहते.”

प्रशासकीय यंत्रणेवर आणि ‘त्या’ अदृश्य शक्तीवर प्रहार

शासकीय कार्यालयात अन्यायाविरुद्ध दाद मागणाऱ्या सामान्य नागरिकांची व्यथा मांडताना दिव्या मित्तल यांनी थेट यंत्रणेतील ‘वरच्या’ दबावावर प्रश्न उपस्थित केले. “एका भूमिहीन माणसाला जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले, तेव्हा ‘वरून’ नकार आल्याचे मला सांगण्यात आले. हा ‘वरचा’ माणूस नक्की कोण आहे? आपल्या देशाचे संविधान सांगते की नागरिकच सर्वोच्च आहेत. मग न्यायासाठी सामान्य माणसाला दरदर भटकावे का लागावे?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला.

याशिवाय, रस्ते, पूल आणि आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “जिथे प्रश्न सुटत नाहीत, तिथे मृत्यू हा अपघात नसून प्रशासकीय दुर्लक्षामुळे घेतलेला निर्णय असतो.”

कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा घेणार नाही

राजकारणात येण्याच्या आपल्या हेतूविषयी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांना फक्त राजकीय चेहरे बदलायचे नाहीत, तर राजकारणाची पद्धतच बदलायची आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता, थेट जनतेच्या साथीने उत्तर प्रदेशच्या भूमीतून नवी राजकीय वाटचाल सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

“ज्या पक्षांच्या झेंड्याखाली गेल्या ८० वर्षांत परिस्थिती बदलली नाही, तिथे राहून मी हिशोब मागू शकत नाही. मी राजकारणात उतरणार आहे, पण कोणत्याही पक्षासोबत नाही तर थेट जनतेसोबत! लोक हीच माझी अंतिम पायरी आहेत,” असे त्यांनी ठासून सांगितले.

“महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न, पण मी थांबणार नाही”

राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वीच आपल्यावर सुरू झालेल्या राजकीय चिखलफेकीचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. “मी एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला रात्रीच्या अंधारात भेटल्याची अफवा पसरवण्यात आली. एका स्त्रीने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की तिला पहिल्याच दिवशी घाबरवणे हाच यामागील उद्देश होता. गुन्हा दाखल करायचा, ट्रोल करायचे आणि सामान्य लोकांना राजकारणापासून दूर ठेवायचे—हीच यांची पद्धत आहे. पण मी घाबरणार नाही, मी प्रश्न विचारतच राहीन,” असा इशारा त्यांनी दिला.

embed kar

उत्तर प्रदेश हीच कर्मभूमी

आगामी राजकीय प्रवासासाठी पैशांचे बळ, बाहुबल आणि जाती-धर्माचे समीकरण नसल्याचे मान्य करत त्या म्हणाल्या, “मी अधिकारी असताना कधी कोणाची जात-धर्म विचारून न्याय केला नाही, राजकारणातही करणार नाही. पैशांचे आणि बाहुबलाचे राजकारण संपवून जनतेच्या ताकदीवर आधारित नवं व्यासपीठ उभारले जाईल.”

आपल्या संदेशाच्या शेवटी त्यांनी उत्तर प्रदेशशी असलेले आपले नाते अधोरेखित केले. “मी इथे अधिकारी म्हणून आले होते, पण येथील लोकांनी मला मुलगी मानले. उत्तर प्रदेशच्या मातीनेच मला माझी ओळख दिली आहे, त्यामुळे माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात याच भूमीतून होईल,” अशी घोषणा त्यांनी केली.