दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी; केजरीवाल सरकारचा निर्णय

दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

firecrackers
(Express Photo by Praveen Khanna/ File)

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंद घालण्यात आली आहे. गेल्यावर्षी दिवाळीत झालेलं वायू प्रदूषण पाहता यावर्षी आधीच केजरीवाल सरकराने फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षी दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, “गेल्या ३ वर्षांपासून दिवाळीच्या वेळी दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक स्थिती पाहता, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवणुकीवर, विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली जात आहे. जेणेकरून लोकांचे जीव वाचवता येतील. तसेच गेल्या वर्षी, व्यापाऱ्यांनी फटाके साठवल्यानंतर, प्रदूषणाचे गांभीर्य पाहता उशीरा पूर्ण बंदी घालण्यात आली, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी फटाक्याची साठवण न करण्याचे आवाहन सर्व व्यापाऱ्यांना करण्यात येत आहे.”

पंजाब आणि हरयाणामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतातील तन जाळतात, त्यामुळे या दोन महिन्यात दिल्लीतील प्रदुषणाची पातळी उच्चांक गाठते.

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी गवत जाळणे आणि प्रदूषणाबाबत पत्रकार परिषदही घेतली होती. गवत जाळण्याऐवजी त्यांनी बायो डीकम्पोझरच्या वापरावर भर दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना येणार आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरपासून दिल्लीची हवा पुन्हा खराब होऊ लागेल. याचे मुख्य कारण शेजारच्या राज्यांमध्ये गवत जाळल्यामुळे येणारा धूर आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणासाठी आतापर्यंत सर्व राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ककरत आहेत. याच दरम्यान, दिल्ली सरकारने यावर उपाय शोधला आहे. पूसा इन्स्टिट्यूटने एक बायो-डीकम्पोझर सोल्यूशन तयार केले आहे. या सोल्यूशनची फवारणी केल्यानंतर गहू कापणीनंतर उरलेले देठ सडून जातात, त्यामुळे शेत पेरणीसाठी पुन्हा तयार करण्यास मदत होते आणि कचरा जाळण्याची गरज भासत नाही. गेल्यावर्षी दिल्ली सरकारने राज्यातील ३९ गावांमधील तब्बल १९३५ एकर जमिनीवर याची फवारणी केली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Diwali firecrackers banned in delhi over air pollution hrc