लग्नाच्या वरातीत वाजणाऱ्या डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल १४० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी त्रस्त पोल्ट्री फार्म मालकाने पोलिसांत धाव घेत डीजे चालकाविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

नेमकी घटना काय?

सुलतानपूर येथील कुडवार भागात राहणार्‍या बब्बन विश्वकर्मा यांच्या मुलीच्या लग्नाची वरात २५ एप्रिलच्या रात्री गावातून जात होती. या वरातीत मोठ्या आवाजाचा डीजे लावण्यात आला होता. गावाजवळच साबीर अली नावाच्या व्यक्तीचा ‘साबीर अली पोल्ट्री फार्म’ आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास जेव्हा ही वरात पोल्ट्री फार्मच्या समोरून जात होती, तेव्हा डीजेचा आवाज अतिशय तीव्र होता. साबीर अली यांनी आरोप केला आहे की, आवाजाच्या मोठ्या लहरींमुळे कोंबड्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. आवाजाचा हा धक्का सहन न झाल्याने पाहता पाहता १४० कोंबड्या जागीच दगावल्या.

पोलीस तक्रार आणि कारवाई

आपल्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहून साबीर अली यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले. आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले की, “डीजेचा आवाज इतका भयानक होता की कोंबड्या घाबरल्या आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.”

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मंगळवारी रात्री परसीपूर येथील डीजे ऑपरेटर कवी यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक दृष्टीने तपास करत आहेत. ज्या वेळी ही घटना घडली, तेव्हा डीजेचा आवाज प्रशासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होता का, याची शहानिशा केली जात आहे.

आवाजाचा पक्षांवर परिणाम

पक्षी आणि प्राण्यांवर आवाजाच्या होणाऱ्या परिणामांबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उच्च तीव्रतेच्या ध्वनीलहरींमुळे प्राण्यांमध्ये ‘सिव्हिअर स्ट्रेस रिस्पॉन्स’ (Severe Stress Response) म्हणजेच तीव्र तणाव निर्माण होतो. पक्षी निसर्गतः संवेदनशील असतात. आवाजाच्या प्रचंड कंपनमुळे त्यांच्या हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊन त्यांना ‘कार्डियाक अरेस्ट’ (हृदयविकाराचा झटका) येऊ शकतो. या घटनेतही कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण हाच मानसिक आणि शारीरिक धक्का असल्याचे प्राथमिक रित्या दिसून येत आहे.

मर्यादेबाहेरील आवाजाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

लग्नसमारंभात किंवा मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवणे ही एक मोठी समस्या बनली आहे. या घटनेमुळे केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर मुक्या प्राण्यांवरही त्याचे जीवघेणे परिणाम होऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप संबंधित वधू पक्षाकडून किंवा डीजे ऑपरेटरकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.